…तरच भारत महासत्ताक बनेल…!

0
12

विमल आजी-काय, ग रिंकू आज शाळेत हा असा भारत मातेचा वेष का करून गेली होती?
रिंकू- अहो, आजी या वर्षी आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झालीत ना म्हणून सर्वत्‌ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे, तेव्हा आज आमच्या शाळेतही त्याचाच एक उपक्रम म्हणून प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते, त्यात मी भारत माता झाली होती. म्हणून ही वेशभूषा केली होती.
विमल आजी -हो… का बरं, अग पण हे प्रत्येक घरी तिरंगा का लावायला सांगितला आहे या वर्षी?
रिंकू- अहो, आजी प्रत्येक भारतीय नागरिकाला आपल्या हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण करून देण्यासाठी तसेच प्रत्येक नागरिकाच्या मना- मनात तिरंगा विषयी अभिमान निर्माण होण्यासाठी…..वीरपुरुषांच्या त्यागाची, बलिदानाची आठवण करून देण्यासाठी हर घर तिरंगा हे अभियान राबवले जात आहे.
विमल आजी- हो, ग बाई… ते वीर-जवान तर त्यांचे कर्तव्य करून अजरामर झाले, आपल्या साठी त्यांनी वीरमरण पत्कारले….. आता पुढची जबाबदारी आपलीच नाही का….? (विमल आजी चिंतेच्या स्वरात म्हणाल्य)  त्यांची ही चिंता तितकीच योग्य होती, कारण गेल्या 75 वर्षात आपण अनेक चांगल्या वाईट घटनांना सामोरे गेलेलो आहोत आणि, याच्या साक्षीदार विमल आजी सुद्धा होत्या. तसेच आजच्या तरुण पिढीचे बेजबाबदार पणे वागणे, पैशासाठी माणुसकी ला विकणाऱ्या घटना आजीने सुद्धा उघड्या डोळ्यांनी पहिल्या होत्या. असो…..
दीडशे वर्षे ब्रिटिशांच्या गुलामगिरीत असलेला आपल्या भारत देशाला स्वतंत्र होऊन आज 75 वर्षे पूर्ण झाली, म्हणून आज आपण हा अमृत महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करत आहोत. आणि याच निमित्ताने हर घर तिरंगा, तसेच शाळेत, कॉलेजमध्ये, प्रभात फेरी,  वृक्षारोपण, महिला मिळावे, स्वातंत््रय सैनिकांचे मार्गदर्शन, इत्यादी.. अनेक उपक्रम आपण शाळा गाव पातळीवर राबवत आहेत आणि हो, मला देखील, या लोकशाहीतील सार्वभौम देशाचा नागरिक या नात्याने माझे विचार मांडण्याची संधी या लेखणी द्वारे मिळाली हे मी माझे भाग्यच समजते. असो…  स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झालीत, म्हणजेच आपली पारतंत्र्यातून सुटका झाली. झाली नव्हे… तर आपल्या थोर महापुरुषांनी ती सुटका आपणास करुन दिली.पण खरंच स्वातंत्र्य म्हणजे तरी काय?….. तर आजच्या 75 वर्षांपूर्वी आपल्याला आपल्याच देशात राहून साधा मोकळा श्वास घेण्याची सुद्धा मुभा नव्हती. जनतेला स्वतः कष्ट करून राबराब राबून दुसऱ्यांच्या गुलामगिरीत राहावे लागत होते, रोजच्या जेवणातील अपरिहार्य असणारा घटक म्हणजे मीठ या मिठावर सुद्धा जाचक कर लादले गेले होते, थोडक्यात काय तर या ब्रिटिशांच्या काळात जीवन जगणेच असह्य झाले होते, तेव्हा क्रांतिकारकांनी ब्रिटिशांविरुद्ध जे आक्रमक पाऊल उचलले आणि त्यातुन जी क्रांती घडवून आणली ते स्वातंत्र्य. अहो, साधे उदा. सांगते, आपल्या हक्काची वस्तू आपण सहजासहजी कोणाला देत नाही मग तो  साधा पेन का असेना …आणि हे ब्रिटिश मात्र व्यापाराच्या निमित्ताने भारतात आले, आणि हळूहळू राज्यकर्ते झाले. आपल्यावर हुकूमत गाजवून आपल्यावर जुलमी राज्य केले, तेव्हा खरोखर, हा सगळा अन्याय आपल्या हुतात्म्यांनी कसा सहन केला असेल नाही? आणि त्यांनी तो अन्याय हा केवळ शाब्दिक नाही तर शारीरिक हाल अपेष्टा, सहन करून, स्वतःचे बलिदान दिले. आपल्या घरा-दारावर  तुळशीपत्र ठेवले. आपले सर्वस्व देशासाठी समर्पित केले.
प्रसंगी त्यांनी स्वतः मरण पत्करले, वेळ आली तर स्वतःचे शीर खाली पडू दिले पण देशाची आण-बान-शान असलेला तिरंगा कधी खाली पडू दिला नाही. असा तिरंगा की, ज्यातील केशरी रंग महापुरुषांच्या त्यागाचे प्रतीक आहे, पांढरा रंग त्या शांततेचे प्रतीक आहे जी शांतता, आज माझे वीर जवान सीमेवर लढत आहेत, पहारा देत आहेत, म्हणून आपण शांततेने जगत आहोत. अशा शांततेचे प्रतीक आहे आणि हिरवा रंग म्हणजे जगाचा पोशिंदा असलेला माझा शेतकरी दादा जो दिवस रात्र कष्टाने या भारत मातेला सुजलाम सुफलाम बनवतो, त्या समृद्धीचे प्रतीक आहे. आणि अशोक चक्र जे आपणास सतत गतिमान राहण्याचा संदेश देते म्हणूनच आज हा तिरंगा घराघरावर फडकवला जात आहे.

धर्म तिरंगा कर्म तिरंगा
चराचरात तिरंगा
सत्य तिरंगा नित्य तिरंगा
हर घर तिरंगा

या उक्तीनुसार तिरंग्याचे स्मरण आणि आपल्या हुतात्म्यांचे बलिदान इत्यादीचे स्मरण आपल्या मनामनात कायम ठेवणे गरजेचे आहे. मित्रांनो देशाला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्षे पूर्ण झालीत.या 75 वर्षात आपण खूप काही  प्रगती केली साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, उद्योगधंदे, शैक्षणिक, वैमानिक, मेडिकल, या सर्व क्षेत्रात आपण आपल्या देशाची मान उंचावली.
पण… त्याचबरोबर खेदाची आणि लाजिरवाणी बाब म्हणजे या प्रगती बरोबर आपणस भ्रष्टाचार, हुंडाबळी, बलात्कार, बेरोजगार अशा मानवतेला काळीमा फासणाऱ्या गोष्टींनी आपल्याला ग्रासले..आणि आपणही तितकेच त्याला बळी पडलो, आणि आजही पडत आहोत, तसेच पारतंत्र्यात असतांना समाज प्रबोधन करण्यासाठी, जनतेला स्वतंत्र कोणत्या मार्गाने मिळवता येईल हे सांगण्यासाठी एकत्‌ येणे गरजेचे होते पण तसे स्वातंत््रय नव्हते तेव्हा टिळकांनी एकतेची भावना जोपासता यावी, समाज प्रबोधन करता यावे, म्हणून धर्माच्या नावाखाली शिवजयंती आणि गणेश उत्सव सुरू केले, पण  आज तर मात्र  घटनेने आपणास भाषण स्वातंत््रय दिले, व्यक्ती स्वातंत््रय दिले पण त्याचा गैरवापर करून माणूस जाती-धर्माच्या नावाखाली उगाच इतर धर्माची विटंबना करून आपापसातच लढत आहे आणि त्यातूनच दंगली, जाळपोळ सारख्या घटना घडून नाहक सर्वसामान्य माणूस होरपळला जात आहे.खरं सांगू मित्रांनो सहज मिळालेल्या गोष्टीची किंमत नसते, या विचारानुसार आज आपण हे स्वातंत्र्य विनासायास उपभोगत आहोत आणि म्हणूनच की काय आपण स्वातंत्र्याची व्याख्या स्वैराचार अशी  करून ठेवली आहे. ज्या शालेय प्रतिज्ञेत आपण म्हणतो की, सारे भारतीय माझे बांधव आहेत, तर मग…भर रस्त्यावर छेड काढली जाणारी मुलगी ही आपली बहीण नसते का? तरीही आपण त्याला प्रतिकार न करता, उलट त्या मुली बाबत समाजात उलट सुलट चर्चा करतो. उघड्या डोळ्यांनी आपण स्त्रियांवर होणारा अन्याय, अत्याचार, हुंडाबळी मूळे उध्वस्त होणारे कुटुंब, यासारख्या घटना बघतो, मग ती स्त्री ही आपली माता-भगिनी नसते का? सांगा ना?….तसेच एखाद्या धार्मिक स्थळी किल्ल्‌यांवर किंवा पर्यटन स्थळी गेल्यावर आपण तिथे आपली नावे कोरतो, तिथे घाण, कचरा करतो, आणि  प्रतिज्ञेत म्हणतो की विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे, मग आपली नावे कोरतांना, त्या ठिकाणी तोडफोड-नुकसान करतांना, मी म्हणते कुठे जातो हा आपला अभिमान? तसेच भ्रष्टाचार….भ्रष्टाचाराचे तर विचारूच नका…..तो राक्षस तर सर्वच क्षेत्रात फोफावत चालला आहे.साधे उदाहरण द्यायचे झाले तर, एखादा आर्थिक दृष्ट्‌या गरीब विद्यार्थी कष्टा, परिश्रम, जिद्द, मेहनत करून केवळ स्वतःचे, समाजाचे दिवस बदलावेत म्हणून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच वेळी एखादा पात्र  नसलेला  विद्यार्थी केवळ पैशाच्या जोरावर सहजपणे नोकरीला लागतो, त्यामुळे आजही बेरोजगारांची संख्या वाढत चालली आहे म्हणजे मी म्हणते की, गरिबांनी पुढे जाऊच नये का ?….आणि  यातूनच आपल्या  समाजात आर्थिक विषमतेची दरी वाढत चालली आहे. 10 टक्के जनता करोडो च्या घरात आहे, 60%जनता केवळ अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण या मूलभूत गरजा भागवू शकत आहे. समाजातील 30 टक्के जनतेला आजही दोन वेळेच्या जेवणाची, निवाऱ्याची मारामार आहे. आणि याला कारण फक्त आणि फक्त हा भ्रष्टाचार…आणि त्यातच सतत वाढत जाणारी लोकसंख्या…यामुळे आजही ग्रामीण भागात कुपोषण, निरक्षरता, बालकामगार या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.आणि त्यासाठी गरज आहे ती समाजाने जागरूक होण्याची, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या भ्रष्टाचार रुपी रावणाचे दहन करण्याची.
तेव्हा आज या अमृत महोत्सवाच्या प्रसंगी आपण सारे प्रतिज्ञा बद्ध होऊया की,आजपासून आम्ही लाच देणार नाही आणि घेणार ही नाही.खरोखर असे जर प्रत्येकाने मनाशी ठामपणे ठरवले ना तर भारताला महासत्ताक होण्यास उशिर लागणार नाही आणि आपल्या हुतात्म्यांनी,महापुरुषांनी समृद्ध भारताचे जे स्वप्न उराशी बाळगले असेल ते नक्कीच पूर्ण होईल..
आज आपण स्वतंत्र देशात जगत आहोत, तेव्हा आपल्याला कोणत्याही प्रकारचे बलिदान देण्याची गरज नाही, पण आज वेळ आली आहे ती गोरगरीब, शोषित, पीडित, शिक्षणापासून वंचित, असलेल्या आपल्याच बंधू-भगिनींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची. तेव्हा भारताचा भावी, सुजाण नागरिक या नात्याने आपण आतापासूनच या समाजाला काळीमा फासणाऱ्या प्रथांना खतपाणी न घालता, प्रत्येक क्षेत्रात खोलवर पसरलेली ही अनिष्ठ प्रथांची मूळे मुळासकट नष्ट करण्यासाठी पाऊल उचलूया, मग तेव्हा कुठे प्रत्येकाच्या मनामनात तिरंगा आहे असे आपण अभिमानाने सांगू शकू. आणि यातूनच तिरंग्याचा खरा अर्थ सर्वांना कळेल. आणि मित्रांनो त्यातून पुढील 25 वर्षांनी म्हणजेच भारताने शंभरी पार केल्यावर माझ्या भारत देशाचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल, आणि माझा भारत नक्कीच सुवर्ण भारत असेल, शेवटी एकच सांगेन, स्वातंत्र्यवीरांना करूया शत शत प्रणाम! त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…!
॥ जय हिंद जय भारत ॥

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here