नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून मिळविले नावलौकीक
विद्यार्थी हित जोपासणारे आणि विद्यार्थी हेच माझे दैवत मानणारे शिक्षक तथा मुख्याध्यापक प्रभाकर तुकाराम पाटील (पी.टी.पाटील) हे जिल्हा परिषद मराठी शाळा टाकरखेडा ता.जामनेर जि जळगाव येथे ग्रेडेड मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. शालेय कामकाज सांभाळून साहित्य रचनेचे काम सुद्धा करतात. काही माणसे, माझी शाळा, आटोपला खेळ, तरफडा, शेतकरी आदी विषयांवर त्यांच्या कविता वस्तुस्थितीला अनुसरून आहेत. या अगोदर त्यांचा चारोळी काव्यसंग्रह “बालविश्व” तसेच “किलबिल” प्रकाशित झालेला आहे. पी.टी.पाटील यांनी आईबद्दल “माय” आणि वडिलांबद्दल “बाप” हे काव्यसंग्रह संपादित केलेले आहे. माय आणि बाप या काव्यसंग्रहात महाराष्ट्रातील नामवंत कवींच्या कवितांचा समावेश आहे. हे काव्यसंग्रह स्वखर्चाने प्रकाशित केले आहे.
नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे शिक्षक तथा मुख्याध्यापक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. एक मिनिट स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, इत्यादी उपक्रम ते दरवर्षी शाळेत विद्यार्थ्यांकडून राबवून घेतात व प्रेरणा देण्याचे कार्य करतात. विशेष म्हणजे जेवणाच्या मधल्या सुट्टीत विद्यार्थ्यांमधे बसून जेवणाचा आस्वाद घेतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांविषयी आदर वाटतो व गोडी निर्माण होते. दररोज ते स्वच्छतेवर भर देतात. वरिष्ठ अधिकारी ज्या वेळेस शाळेला भेटी देतात त्यावेळेस स्वच्छ शाळा म्हणून टाकरखेडा शाळेचा उल्लेख करतात. पालकांच्या सहकार्याने, ग्रामपंचायत व शिक्षकांच्या तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने आणी शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी यांच्या मदतीने बाला उपक्रमांतर्गत १लाख रूपयांचा निधी गोळा केलेला आहे. यामध्ये मुख्याध्यापक यांचा सिंहाचा वाटा आहे. “विद्यार्थी हेच माझे दैवत” हे ब्रीदवाक्य पाटील यांचे आहे.पालक सभेत अक्षरशः पाटील यांनी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थीनीच्या पाया पडलेल्या आहेत. विद्यार्थी हित जोपासण्यासाठी ते दानशुर व्यक्तींना भेटून त्यांच्या मदतीने दप्तर वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप, डिक्शनरी वाटप करतात.
पी. टी. पाटील दरवर्षी तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेतात. त्यांना अनेक वेळा तालुकास्तरीय प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ बक्षिस व प्रमाणपत्र मिळालेले आहेत. तसेच जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सुद्धा प्रथम क्रमांक मिळाला आहे. परभणी येथे राज्य स्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. राष्ट्रीय कार्यात जनगणना, मतदान ओळखपत्र, कुटुंब कल्याण च्या २८केसेस, ५ वेळा रक्तदान केले आहे. नोकरी सुरवात २ ऑगस्ट १९९१ रोजी बात्सर, ता. भडगाव येथे प्रथम नियुक्ती झालेली आहे. जामनेर तालुक्यातील शहापूर, संतोषीमातानगर पहूरपेठ येथे १६ वर्षे ५ महिने उपशिक्षक म्हणून कार्य केले आहे. तसेच २० डिसेंबर २००७ पासून ते आजपर्यंत ग्रेडेड मुख्याध्यापक पदावर पदोन्नती कार्यरत आहेत. पहूरपेठ कन्या, खादगाव आणि टाकरखेडा ता.जामनेर येथे मुख्याध्यापक पद सांभाळून आहेत. राष्ट्रीय कार्य, सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेले आहेत.
खेळ गणिताचा, म्हातारीची शेती होती, दर शनिवारी आनंददायी शिक्षण, कवायत, स्वच्छतेच्या सवयी, स्वच्छतेचे महत्व आदी काही उपक्रम राबवित असतात. प्रामाणिकपणा हा माझ्या नोकरीच्या काळात टिकून आहे. त्याचे फळ मला मिळालेले आहेत. त्यांची मुलगी आणि जावईबापू हे परदेशात नेदरलँड येथे इंजिनिअर पदावर कार्यरत आहेत. तसेच मुलगा पुणे येथे मोठ्या नामांकित कंपनीत इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. हीच मला माझ्या कामाची पावती मिळालेली आहे, असे शांतीसुत पी.टी.पाटील यांनी सांगितले.
पी. टी. पाटील यांना मिळालेले पुरस्कार असे-
- जामनेर पंचायत समिती कार्यालयतर्फे शिक्षक पुरस्कार १९९५-१९६ मध्ये मिळाला आहे.
- जिल्हा परिषद जळगाव शिक्षक पुरस्कार-१९९९
- भारतीय दलित साहित्य अकादमी नवी दिल्ली तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप अवार्ड – २०००
- डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदे तर्फे महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक गौरव सन्मान – २८ नोव्हेंबर २००९
- जळगाव जिल्हा पॉवर लेफ्टनंट असोसिएशन बोदवड यांच्यातर्फे जिल्हा स्तरीय महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार
- मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी ट्रस्टतर्फे महाराष्ट्र गुणीजन रत्नगौरव पुरस्कार – २०१३
- अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ केंद्रीत प्रचार कार्यालय गुरुकुंज आश्रम, जि. अमरावती यांच्यातर्फे संत गाडगे महाराज नागरी व ग्राम स्वच्छता राष्ट्रीय पुरस्कार
- साई समर्थ फाउंडेशन (महाराष्ट्र राज्य) सांगलीतर्फे राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्कार- २०१८
- पी.आर.पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार – ५ सप्टेंबर २०१८.
पी.टी.पाटील हे ३० सप्टेंबर २०२४ सेवानिवृत्त होत आहे. सेवानिवृत्तीनंतर सामाजिक तसेच शैक्षणिक कार्य करण्याचा त्यांचा मानस आहे.