‘माझे रोप-माझी जबाबदारी’ उपक्रमाचा बोर्ड रुबाबात…रोप मात्र गेले ‘कोमात’

0
4

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

येथील वनविभाच्या माध्यमातून सप्टेंबर २०२२ जुलै २०२३ या कालावधीत ‘विद्यार्थी वन माझे रोप-माझी जबाबदारी’ अशी शहरातील शाळांना भावनिक साद घालण्यात आली होती. यासाठी १८ शाळांनी प्रतिसाद देत १५ हजार ५०५ विद्यार्थ्यांना रोप बनविण्यासाठी प्रति विद्यार्थी पाच पिशव्या व बियांचे वाटप केले होते. या माध्यमातून तीन हजार ५०० विद्यार्थ्यांनी तीन हजार ५०० रोप तयार केल्याचा दावा वनविभागाने केला होता. या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रोपांची लागवड त्यांच्याच हस्ते शहरापासून हाकेच्या अंतरावरील बिलाखेड बायपास लगत वनपरिक्षेत्राच्या जागेवर वनविभाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पुढाऱ्यांच्या उपस्थितीत मोठा गाजावाजा व प्रसिद्धी करत केली होती.

‘माझे रोप-माझी जबाबदारी’ या भावनिक सादेला विद्यार्थ्यांनी प्रतिसाद देत जबाबदारी पार पाडली. परंतु ज्या वनविभागाने उपक्रमांचे आयोजन केले होते. त्या वनविभागाने मात्र आपली जबाबदारी नक्कीच पाळली नाही. चिमुकल्या हातांनी लावलेल्या कोवळ्या रोपांना लावल्यानंतर कमीत कमी तीन वर्ष पाणी देणे, काळजी घेणे आवश्‍यक असतांना फक्त प्रसिद्धी, वाहवा मिळविण्यासाठी राबविलेल्या उपक्रमाकडे लागलीच पाठ फिरविल्यामुळे ही सगळी रोप कोमेजून गेली. एकप्रकारे वनविभागाने कोवळ्या विद्यार्थ्यांच्या भावनांसह रोपांची हत्याच केली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

पाण्याअभावी सुकली रोपे

गेल्यावर्षी भीषण दुष्काळ परिस्थिती होती हे मान्य आहे. परंतु जर मेहनत घेऊन आपण रोप लावतोय त्याचे नियोजन असणे गरजेचे आहे. लगतच्या सामाजिक वनीकरण विभागाने १७ कि.मी.अंतरावरील ब्राम्हणशेवगे येथे चाळीसगाव येथून टँकरने पाणी आणून झाडांना जगविण्यासाठी प्रयत्न केला असतांना चाळीसगाव शहरालगतच्या विद्यार्थी वनातील रोपांना पाण्याअभावी सुकावे लागणे, म्हणजे ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.

विद्यार्थ्यांच्या भावनांना तुडविले पायदळी

वरिष्ठांची मर्जी मिळविण्यासाठी व पद प्रसिद्धी, प्रतिष्ठा मिळविण्यासाठी, बेगडी पर्यावरण प्रेम दाखविण्याचा हा प्रयत्न नक्कीच पर्यावरणाला घातकच आहे. अशा प्रकारे उपक्रम राबवून हजारो पिशव्यांसाठीचा झालेला खर्च, बियांचा जमा करण्यासाठी केलेला खर्च, खड्डे करण्यासाठी रोटरी क्लब व इतर सामाजिक संस्थांचा लोकसहभागाच्या गोंडस नावाखाली झालेला खर्च, वनमजूर, १८ शाळा, १५ हजार ५०५ विद्यार्थ्यांची मेहनत, वेळ वाया घालविणे व त्यांच्या भावनांना पायदळी तुडविणे कितपत योग्य आहे? असा प्रश्‍न पर्यावरण प्रेमींमधून उपस्थित होत आहे.

‘त्याला’ जबाबदार कोण….?

एकीकडे अशा प्रकारचे बेगडी वृक्षप्रेम वनविभाग दाखविते तर दुसरीकडे हजारो डेरेदार अवैध वृक्षतोडीकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करणे या प्रकारामुळे चाळीसगाव तालुका ओसाड होण्याच्या मार्गावर आहे. त्याला जबाबदार कोण? सामान्य नागरिक की ज्यांची जबाबदारी आहे तो वनविभाग? जे ‘माझे रोप-माझी जबाबदारी’ अशी शिकवण, धडे इतरांना देतात. आपली स्वतःची जबाबदारी मात्र झटकतात, अशी खंत जल व पर्यावरण प्रेमी सोमनाथ माळी यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here