पेपर लीक, गैरकारभारावरून ‘कॉकरोच जनता पार्टी’चा सरकारवर तीव्र हल्ला; ९४ लाख नागरिकांच्या स्वाक्षरी मोहिमेचा दावा
साईमत न्यूज नेटवर्क –
सरकारच्या कथित गैरकारभारामुळे देशातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाढत असून, तरीही जबाबदार मंत्री पदावर टिकून असल्याचा आरोप करत ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
‘साम टीव्ही’शी बोलताना दिपके यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त करत म्हटले की, “दुसऱ्यांचे प्राण वाचवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याला स्वतःचा जीव द्यावा लागतो, यापेक्षा दुर्दैवी काहीच नाही.” देशातील वाढते पेपर लीक प्रकरण आणि परीक्षांतील गोंधळ याला सरकार जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.
नीट (NEET) परीक्षेतील अनियमितता तसेच महाराष्ट्रातील पोलीस भरती परीक्षांतील कथित पेपरफुटीचा उल्लेख करत त्यांनी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू असून, अशा परिस्थितीत जबाबदार मंत्र्यांनी पदावर राहणे योग्य नाही,” असेही ते म्हणाले.
दरम्यान, ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (CJP) ९४ लाख नागरिकांच्या स्वाक्षरी मोहिमेचा दावा केला आहे. या सर्व नागरिकांच्या स्वाक्षऱ्या संकलित करून शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची अधिकृत मागणी करण्यात येणार असल्याचे दिपके यांनी स्पष्ट केले.
सरकारच्या चुकीच्या निर्णयांची किंमत विद्यार्थ्यांना जीव देऊन मोजावी लागत असल्याचा आरोप करत, “चूक सरकारची आणि व्यवस्थेची असताना शिक्षा मात्र विद्यार्थ्यांना का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
