डॉक्टर होण्याचे स्वप्न अर्धवट धरणात तरुणाचा मृत्यू
साईमत/चाळीसगाव / प्रतिनिधी :
बकरी ईदच्या दिवशी चाळीसगाव तालुक्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेने परिसर हादरला आहे. पिराचे बोरखेडा येथील धरणात पोहण्यासाठी गेलेल्या पाच मित्रांपैकी एका २० वर्षीय वैद्यकीय विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मोईन जाकीर झारेकरी (वय २०, रा. घाटरोड, चाळीसगाव) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे.
गुरुवारी दुपारी नागदरोड परिसरातील पाच मित्र बोरखेडा धरण परिसरात फिरण्यासाठी व पोहण्यासाठी गेले होते. सुरुवातीला आनंदात असलेला हा वेळ काही क्षणांतच भीषण दुर्घटनेत बदलला. पोहत असताना मोईनला पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गेला आणि बुडू लागला. मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पाण्यात नाहीसा झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह नातेवाईकांनी धरण परिसरात धाव घेतली. तसेच उपनगराध्यक्ष हर्षल चौधरी, नगरसेवक अनिल ठाकरे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिक मदतकार्यात सहभागी झाले. तब्बल तीन ते चार तासांच्या शोधमोहिमेनंतर सायंकाळी सुमारे ६ वाजता मोईनचा मृतदेह धरणातील गाळात अडकलेल्या अवस्थेत आढळून आला आणि बाहेर काढण्यात आला.
मृत मोईन हा वैद्यकीय शिक्षण घेत असलेला हुशार व होतकरू विद्यार्थी होता. भविष्यात डॉक्टर होऊन कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करेल, अशी त्याच्या कुटुंबीयांची मोठी अपेक्षा होती. मात्र या दुर्दैवी घटनेने त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला असून, ईदच्या दिवशीच घरी मृतदेह पोहोचल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेनंतर चाळीसगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, तरुण वयात घडलेल्या या अकाली मृत्यूने सर्वत्र शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.
