पिकअपच्या जोरदार धडकेत दोन बहिणी ठार, आई-वडील गंभीर जखमी
साईमत/चाळीसगाव/ प्रतिनिधी :
नातेवाईकांच्या कार्यक्रमावरून घरी परतणाऱ्या एका कुटुंबावर दहिवद फाट्याजवळ काळाने घाला घातला. समोरून आलेल्या पिकअप वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत दोन सख्या बहिणींचा मृत्यू झाला, तर त्यांचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे हिरापूर गावावर शोककळा पसरली आहे.
चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर येथील राकेश शिंदे हे कुटुंबीयांसह मालेगाव येथे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रमानंतर ते छोटा हत्ती वाहनातून गावी परतत असताना दहिवद फाट्याजवळ त्यांच्या वाहनास समोरून येणाऱ्या पिकअपने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की वाहनातील प्रवासी गंभीर जखमी झाले.
या अपघातात जयश्री राकेश शिंदे (१९) हिने जागीच प्राण गमावले. तर राकेश शिंदे, त्यांची पत्नी, नंदिनी शिंदे (१६) आणि अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, उपचार सुरू असताना नंदिनी शिंदे हिची प्रकृती चिंताजनक बनली आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही तिचा मृत्यू झाला. त्यामुळे एकाच कुटुंबातील दोन मुलींचा मृत्यू झाल्याने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती मिळताच हिरापूर गावात शोकमय वातावरण निर्माण झाले. दोन तरुण मुलींच्या अकाली निधनामुळे ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली असून कुटुंबीयांवर सांत्वनाचा वर्षाव होत आहे.
या अपघाताची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून दुर्घटनेमागील कारणांचा तपास सुरू आहे.
