साईमत -पारोळा – प्रतिनिधी |
धुळे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्याची लाचखोरी जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) उघडकीस आणली आहे. सुरक्षारक्षक मंडळात नोंदणीच्या शिफारसपत्रासाठी तब्बल लाखो रुपयांची लाच मागणाऱ्या धुळे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यासह एका खासगी व्यक्तीवर पारोळा येथे धडक कारवाई करण्यात आली. पारोळ्यातील ‘हॉटेल ग्रीन पार्क’मध्ये ४ लाख ८० हजार रुपयांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्तीला एसीबीने रंगेहात पकडले.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण गेल्या १४ महिन्यांपासून धुळे जिल्हा परिषदेत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहे. खासगी सुरक्षा एजन्सीमध्ये ६० दिवस काम केल्यानंतर सुरक्षारक्षक मंडळात नोंदणी केली जाते. तक्रारदारासह त्याच्या इतर चार सहकाऱ्यांच्या नोंदणीचे शिफारसपत्र सुरक्षा मंडळाकडे पाठवण्यासाठी धुळे जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील फिटर (वर्ग-३) पुरुषोत्तम वाघ (वय ५०) आणि बारकू पाटील (वय ६०) यांनी प्रति सुरक्षारक्षक १ लाख ५० हजार रुपयांप्रमाणे एकूण ७ लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
हॉटेल ग्रीन पार्कमध्ये रचला सापळा
तक्रारदाराने यापूर्वी संशयितांना १ लाख रुपये दिले होते. मात्र उर्वरित साडेसहा लाख रुपयांसाठी आरोपींनी वारंवार तगादा लावल्याने तक्रारदाराने ११ ऑगस्ट रोजी जळगाव ‘एसीबी’कडे तक्रार दाखल केली. एसीबीने धुळे जिल्हा परिषदेत पडताळणी केली असता, ५ लाख ८० हजार रुपयांवर तडजोड झाली. यातील आधीचे १ लाख रुपये वजा करून उर्वरित ४ लाख ८० हजार रुपये बारकू पाटील याच्याकडे सोपवण्यास सांगण्यात आले.
बुधवारी सायंकाळी पारोळा येथील ‘हॉटेल ग्रीन पार्क’मध्ये जळगाव एसीबीच्या पथकाने सापळा रचला. तक्रारदाराकडून ४ लाख ८० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच बारकू पाटील याला पंचांसमक्ष ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी पुरुषोत्तम वाघ आणि बारकू पाटील यांच्यावर पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून एसीबी पुढील तपास करत आहे.
