साईमत -भुसावळ प्रतिनिधी |
कर्नाटक एक्स्प्रेसमधून बेकायदेशीरपणे सुगंधित पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्या एका प्रवाशाला भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी आरपीएफ (RPF) पथकाच्या मदतीने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी ६० हजार २८० रुपये किमतीचा अवैध माल जप्त केला आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, १२६२८ अप कर्नाटक एक्स्प्रेस भुसावळ स्थानकात आली असता, तिच्या पुढील जनरल कोचमध्ये लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफच्या संयुक्त पथकाने अचानक तपासणी केली. यावेळी रेल्वे डब्यात संशयास्पदरीत्या बसलेला प्रवासी उमेश वर्मा (वय ४२, रा. खंडवा, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले.
संशयिताजवळील मरून रंगाच्या ‘LAVI SPORT’ कंपनीच्या ट्रॉली बॅगची तपासणी केली असता, त्यात प्रशासनाने बंदी घातलेला ‘Tulsi Royal Zafrani Zarda’ चे १२० पाउच आणि ‘Premium Rajnigandha’ चे १ हजार ६६४ पॅकेट्स आढळून आले. पोलिसांनी ६० हजार २८० रुपयांचा हा सर्व माल जप्त केला असून त्याचे नमुने पुढील रासायनिक विश्लेषणासाठी (Chemical Analysis) प्रयोगशाळेत पाठवले आहेत.
ही धडक कारवाई लोहमार्ग पोलीस निरीक्षक गोविंदा पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफच्या पथकाने संयुक्तपणे पार पाडली. सध्या आरोपी उमेश वर्मा याची सखोल चौकशी सुरू असून यामागील मुख्य साखळीचा शोध पोलीस घेत आहेत.
