साईमत -वरणगाव- प्रतिनिधी |
खाऊचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या वर्षभरापासून टप्प्याटप्प्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना वरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी वरणगाव पोलिसांनी तत्परता दाखवत चार आरोपींना बेड्या ठोकल्या असून, एका विधी संघर्षित बालकाचाही यात सहभाग असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा आणि परिस्थितीचा गैरफायदा घेत आरोपींनी तिला खाऊसाठी पैशांचे आमिष दाखवले. त्यानंतर तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या वेळी तिच्यावर अत्याचार केले. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांनी वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत मनोहर रामा पाटील, मधुकर विश्वनाथ भारंबे, नारायण सोमा चौधरी आणि विनायक वसंत पाटील या चार प्रौढ आरोपींना अटक केली आहे.
या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.
