वरणगावात जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतरही १५ दिवसानंतर पाणीपुरवठा?

0
10

साईमत, वरणगाव : प्रतिनिधी

येथील नगर परिषदेत चार वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे. अशातच नगरपरिषदेच्या नियोजन शून्य कारभारामुळे शहरातील नागरिकांना १५ दिवसानंतर पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. याबाबत माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या तक्रारीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी शहराला भेट देवून नगर परिषद प्रशासनाला आवश्‍यक त्या सूचना दिल्या आहेत. मात्र, यानंतरही पाण्याची समस्या कायम असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

शहरात पंधरा दिवसानंतर पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. मात्र, याबाबत मुख्याधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली होताना दिसून येत नव्हती. त्यामुळे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. वरणगाव शहराला तापी नदी पात्रातून पाण्याची उचल करून सिद्धेश्‍वर नगर येथील जलशुद्धीकरण केंद्राद्वारे पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, नगर परिषदेच्या नियोजन शून्य कारभारामुळे शहरात १५ दिवसानंतर पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

याबाबत माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी वरणगाव शहरात नुकतीच भेट देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची नगर परिषद प्रशासनाला सूचना दिली आहे. मात्र, मुख्याधिकारी सचिन राऊत व प्रशासक प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी गंभीरतेने दखल घेतलेली दिसत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतरही शहरात पंधरा दिवसानंतर पाणीपुरवठा होत आहे.

नियोजन शून्य कारभार

पाणीपुरवठ्यासाठी शहरात ४३ विभाग केले आहे. मात्र, काही भागात दिवसाच्या आत पाणी पुरवठा केला जातो. काही भागांमध्ये पंधरा दिवस उलटूनही पाणीपुरवठा होत नाही. त्यासाठी पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन योग्य नियोजन केल्यास निश्‍चितपणे पाणी पुरवठा पाच ते सहा दिवसांवर येऊ शकतो, यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी दखल घेणे गरजेचे आहे.

पालिका कर्मचाऱ्यांची घडी विस्कटली

येथील नगर परिषेदवर जवळपास पाच वर्षांपासून प्रशासकीय राजवट आहे. नवीन निधी आणण्यासाठी येथे नगरसेवक नाही. तसेच येथील मुख्याधिकारी नव्याने रुजू झाले असले तरी त्यांची निवडणूककामी नियुक्ती जळगावला केली आहे. तसेच बांधकाम अभियंता पद रिक्त असल्याने बांधकाम विभागाची कामे रखडली आहे. तसेच आरोग्य विभागाचे संजय माळी यांचीही निवडणूककामी भुसावळ येथे नियुक्ती केली आहे. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांची घडी विस्कटली असल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे.

पाणीपुरवठा मंत्र्यांचे वरणगावकडे दुर्लक्ष

राज्यात महायुतीचे सरकार आहे. पाणीपुरवठा आणि पालकमंत्री आपल्याच जिल्ह्यातील असूनही वरणगाव शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम संथगतीने सुरू आहे. त्यातच सद्यस्थितीत सुरू असलेल्या पाणीपुरवठ्याला तांत्रिक अडचणीचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर स्वरूप धारण करीत आहे. मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री यांचे तसेच तालुक्याचे आमदार यांचे वरणगाव शहरातील पाणीपुरवठ्याच्या समस्येकडे दुर्लक्ष का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. नागरिकांमध्ये उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाप्रमाणेच संतापाचा पारा वाढल्याने लोकप्रतिनिधींनी याकडे तातडीने लक्ष केंद्रित करण्याची गरज निर्माण झाली आहे.

पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न

वरणगाव नगर परिषदेवर नियुक्ती झाली असली तरी निवडणूक कामाने जळगाव येथे जावे लागते. परंतु शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुख्याधिकारी सचिन राऊत यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here