साईमत/ न्यूज नेटवर्क/ वरणगाव :
बोदवड तालुक्यातील शिरसाळा मारोती मंदिर येथे नवस फेडण्यासाठी जाणारे चार चाकी वाहन हतनूर ते वरणगाव फॅक्टरी मार्गावर उलटून अपघात घडला. त्यात नऊ भाविक जखमी झाले असुन सुदैवाने जीवितहानी टळली आहे. ही घटना रविवारी, ७ जुलै रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान घडली. अपघातात बोरेलो वाहनाचे मागील दोन्ही चाके निखळून पडली असल्याचे घटनास्थळी दिसून आले. याप्रकरणी वरणगाव पोलिसात रात्री उशीरापर्यंत कुठल्याही प्रकारची नोंद झाली नसल्याचे सांगण्यात आले.
सविस्तर असे की, चोपडा तालुक्यातील आडगाव येथील सूर्यवंशी कुटुंबातील मनोज ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांचा एक वर्षीय बालकाचा मानलेला नवस फेडण्यासाठी बोदवड तालुक्यातील शिरसाळा मारोती मंदिर येथे रविवारी, ७ जुलै रोजी आयोजन केले होते. त्यानुसार आडगाव येथून बोलेरो पीकअप वाहन (क्र.एम.एच. १५ एफ.व्ही. २९०२) मध्ये सूर्यवंशी आणि मित्र परिवारातील कुटुंब वाहनात नवस व भोजनाचे साहित्य घेऊन सकाळी ८ वाजेच्या सुमारास निघाले होते. मात्र, प्रवासा दरम्यान हतनूर फाटा ते वरणगाव फॅक्टरी मार्गावर एकाठिकाणी चालक राजेंद्र पाटील याचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे वाहन उलटले. त्यात रवींद्र अमृत न्हावी, मंगलाबाई रवींद्र न्हावी (दोघे रा.चोपडा), हंसीका कैलास न्हावी, शोभा ईश्वर न्हावी, अलका न्हावी, मिनाबाई चित्ते, अश्विनी न्हावी, अर्चना पाटील, यश न्हावी (सर्व रा.आडगाव) यामध्ये जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच वरणगाव फॅक्टरीतील सामाजिक कार्यकर्ते कैलास ठाकुर, अक्षय तेली, अरविंद डोंगरदिवे यांनी घटनास्थळी जावून जखमींना आयुध निर्माणीतील रुग्णालयात दाखल केले. यावेळी सर्व जखमीवर सी.एम.ओ. जॉन मथानी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अमोल पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी उपचार केले. या घटनेतील काही किरकोळ जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार केले.
‘समर्था’च्या कृपेने विघ्न टळले…!
चोपडा तालुक्यातील आडगाव येथील मनोज सूर्यवंशी यांनी त्यांचा एक वर्षीय मुलगा ‘समर्थ’चा भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या शिरसाळे मारोती मंदीर येथे नवस मानलेला होता. यासाठी त्यांच्या परिवारासह मित्र मंडळीवरील वाहनाने भोजनाचे सर्व साहित्य घेवून निघाले होते. मात्र, वाटेतच अपघात झाल्याने वाहनातील सर्व महिला व पुरुष किरकोळ जखमी झाले. त्यामुळे हा अपघात एक कि.मी. अंतरावरील राष्ट्रीय महामार्गावर झाला असता तर भयानक परिस्थिती निर्माण झाली असती. त्यामुळे वाहनात असलेल्या २५ जणांपैकी सुखरूप बचावलेल्या व किरकोळ जखमी झालेल्यांनी ‘समर्था’च्या कृपेने विघ्न टळले, अशी भावना व्यक्त केली.
दोन युवकांचा गेल्यावर्षी गमावला ‘जीव’
शिरसाळे मारोती मंदिर येथे जाण्यासाठी सावदा, फैजपूर, यावल येथील भाविक हतनूर धरण, टहाकळी, काहुरखेडा व बोहर्डी फाटा येथून किंवा वरणगाव फॅक्टरी मार्गाने चौपदरीकरण महामार्ग गाठून मुक्ताईनगर अथवा हरताळेमार्गे शिरसाळे मारोती मंदिर येथे दुचाकी अथवा चारचाकी वाहनाने मार्गक्रमण करतात. अशाचप्रकारे गेल्यावर्षी भल्या पहाटे शिरसाळे मारोती मंदिर येथे दुचाकीने जाणाऱ्या सावदा येथील दोन युवकांना बोहर्डीजवळ झालेल्या अपघातात जीव गमवावा लागला होता.