भुसावळ तालुक्यातील अंजनसोंडे येथील प्रकार
साईमत/ न्यूज नेटवर्क/वरणगाव :
येथील शाळेत जाण्यासाठी बस स्थानकावर वाट पाहत बसलेल्या अंजनसोंडे येथील शाळकरी मुलींना बसमध्ये लाडक्या बहिणींमुळे बसण्यास जागा नसल्याच्या कारणावरून चालकाने बस पुढे नेण्याचा प्रयत्न केला. यामुळे पन्नास ते साठ शाळकरी मुली चक्क बससमोर आडव्या होऊन आम्हाला पर्यायी व्यवस्था होत नाही, तोपर्यंत बस पुढे जाऊ देणार नाही, असा पावित्रा घेत एक तास बस अडवून धरली.
भुसावळ ते सावतर निंभोरा ही बस सकाळी दहा वाजेच्या सुमारास वरणगाव अंजनसोंडे, तपत कठोरामार्गे सावतर-निभोंरा गावाला जाऊन परत येते. परतीच्या प्रवासात तिन्ही गावातील शाळकरी मुले-मुली या बसने वरणगाव येथील शाळेत येतात. सांयकाळी पाच वाजेदरम्यान पुन्हा बसने परत आपआपल्या गावी पोहचतात. शासनाने मुलींसाठी बससेवा मोफत केली असल्याने बहुतेक मुली बसने शिक्षणासाठी प्रवास करीत असतात. मात्र, मागील काही दिवसांपासून सरकारने लाडकी बहिण योजना सुरू केल्याने या योजनांचा लाभाच्या अर्ज दाखल करण्यासाठी सावतर-निभोंरा, तपत कठोरा येथील बहुतांश महिला वरणगाव येथील संगणक कक्षावर बसने येत आहेत. त्यामुळे बसमध्ये लाडक्या बहिणीच्या महिलांची संख्या जास्त होत असल्याने बस ‘हाऊस फुल्ल’ होत आहे.
विद्यार्थिनींनी बस एक तास रोखली
गेल्या सात-आठ दिवसांपासून अंजनसोंडे येथे बसच्या प्रतिक्षेत असलेल्या शाळकरी मुलींसाठी थांबवली जात नाही. त्यामुळे मुलींना शाळेत येण्यापासून वंचित रहावे लागत आहे. याच प्रकारे बुधवारीही बस चालकाने बस पुढे नेण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा संतप्त झालेल्या शाळकरी मुली थेट बस समोर उभ्या होवून आमच्यासाठी पर्यायी बसची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत बस पुढे जावू देणार नाही, असा पवित्रा घेत बस एक तास रोखून ठेवली. यावेळी चालक व वाहक यांनी आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोला, असे सांगितल्याने मुलींनी बसला वाट मोकळी करून दिल्याने बस भुसावळच्या दिशेने मार्गस्थ झाली.
पर्यायी बसची व्यवस्था करू
याबाबत अंजनसोंडे गावातील मुलींच्या पालकांनी भुसावळ आगार व्यवस्थापक राकेश शिवंदे यांच्याशी संपर्क साधल्यावरा बसमधील प्रवाशी व शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या भावना लक्षात घेवून गुरुवारी, २५ जुलैपासून काही दिवसांसाठी मार्गावर दोन बस सेवा सुरू करणार असल्याचे सांगितले.