ट्रकच्या टायरची हवा तपासताना स्फोट
साईमत/ नंदुरबार/ प्रतिनिधी :
तळोदा बायपास परिसरात बुधवारी (दि. 6 मे 2026) सकाळी घडलेल्या एका भीषण अपघाताने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ट्रकच्या टायरमधील हवा तपासत असताना अचानक झालेल्या स्फोटात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला.
सानेश्वर दिलीप मिस्तरी (वय 37, रा. नरडाणा, ता. शिंदखेडा) असे मृत चालकाचे नाव आहे. ते गुजरातमधील नशिराबाद येथून सिमेंटच्या गोण्या घेऊन ट्रक (क्र. MH 18 BG 874) द्वारे तळोदा येथे आले होते. माल उतरवल्यानंतर ते नेहमीप्रमाणे ट्रकची तपासणी करत असताना हा दुर्दैवी प्रकार घडला.
टायरमध्ये हवा तपासत असतानाच अचानक जोरदार स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी अधिक होती की चालकाला सावरण्याची संधीही मिळाली नाही आणि ते जागीच कोसळले. काही क्षणातच त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
स्फोटाचा आवाज परिसरात दूरवर ऐकू गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही क्षणांसाठी वाहतूकही विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा पूर्ण केला असून प्राथमिक तपासात टायरमध्ये अतिरिक्त हवा दाबामुळे स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
या दुर्घटनेमुळे ट्रकचालक समुदायात शोककळा पसरली असून, कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या चालकाचा अशा प्रकारे झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
