खंडेराव मंदिर परिसरात मोलमजुरी करणाऱ्या महिलेची पतीकडून हत्या सात वर्षांच्या चिमुकल्याचे मातृछत्र हरपले पती अटकेत
साईमत /नशिराबाद/ प्रतिनिधी
किरकोळ कौटुंबिक वादातून एका विवाहितेची पतीने कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी नशिराबाद येथील खंडेराव मंदिर परिसरातील खालची आळी येथे घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी आरोपी पतीला तातडीने ताब्यात घेतले आहे.
मंदाबाई विकास जाधव (भिल्ल) (वय ३०) असे मृत महिलेचे नाव असून, विकास जगन जाधव (भिल्ल) (वय ३५) असे आरोपी पतीचे नाव आहे. जाधव दाम्पत्य मूळचे जामनेर तालुक्यातील केकत निंभोरा येथील रहिवासी असून, गेल्या सुमारे वर्षभरापासून मोलमजुरीसाठी नशिराबाद येथे वास्तव्यास होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास घरगुती कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. सुरुवातीला किरकोळ असलेला हा वाद काही क्षणांतच उग्र बनला. संतापाच्या भरात विकास जाधव याने घरात असलेल्या कोयत्याने पत्नी मंदाबाई यांच्यावर सपासप वार केले. चेहरा व मांडीवर गंभीर जखमा झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पंचनामा व प्राथमिक तपासाची प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे पाठविण्यात आला.
या दाम्पत्याला मोहित नावाचा सात वर्षांचा मुलगा असून, आईच्या दुर्दैवी मृत्यूमुळे त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरातील नागरिकही हळहळ व्यक्त करीत आहेत.
दरम्यान, आरोपी विकास जाधव याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. हत्येमागे केवळ कौटुंबिक वाद कारणीभूत होता की अन्य काही कारणे होती, याचा तपास नशिराबाद पोलीस सर्व बाजूंनी करीत आहेत.
