ट्रक अडवून चालकावर चाकू हल्ला अवघ्या १२ तासांत जेरबंद
साईमत /जळगाव/ प्रतिनिधी
जळगाव-भुसावळ बायपास रोडवर ट्रक चालकावर चाकूने हल्ला करून लूट करणाऱ्या अट्टल गुन्हेगार टोळीचा जळगाव तालुका पोलिसांनी अवघ्या १२ तासांत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून एका विधीसंघर्षित बालकासही ताब्यात घेण्यात आले आहे.
ही घटना २० जून २०२६ रोजी रात्री सुमारे १ वाजता पाळधी परिसरात घडली. फिर्यादी मुकेश रामराव राठोड (वय ३०, रा. जालना) हे MH-21-BH-3536 क्रमांकाच्या ट्रकने प्रवास करत असताना चार अज्ञात आरोपींनी त्यांचा ट्रक अडवला. चारचाकी व दुचाकीवरून आलेल्या या टोळीने ट्रकवर दगडफेक करत चालक व क्लीनरला मारहाण केली.
हल्ल्यादरम्यान मुख्य आरोपी शेख साहील शेख जब्बार उर्फ काल्या (वय २६, रा. पाळधी) याने चालकाच्या उजव्या हातावर चाकूने तीन वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपींनी चालकाकडील ५,५०० रुपये रोख रक्कम तसेच फोनपे स्कॅनरद्वारे ९८४ रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून लूट केली आणि घटनास्थळावरून पळ काढला. जखमी चालकावर सध्या जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८८/२०२६ नोंदवण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी डीबी पथकाला तात्काळ तपासासाठी रवाना केले. गुप्त माहिती व जलद कारवाईच्या आधारे पोलिसांनी अल्पावधीतच आरोपींचा माग काढत त्यांना अटक केली.
या कारवाईत साहिल शेख जब्बार शेख उर्फ काल्या, विशाल चुडामण पाटील (वय १८, रा. जळगाव) आणि मोहित हेमंत गुजर (वय १९, रा. पिंप्राळा, जळगाव) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
तपासात समोर आले आहे की मुख्य आरोपी साहिल उर्फ काल्या हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच विशाल पाटील याच्यावरही दरोड्यासह गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ही टोळी संघटित आणि हिंसक गुन्हेगारी प्रवृत्तीची असल्याचे अधोरेखित झाले आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तर तपास मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील यांच्यासह विविध पोलीस कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पोलिसांच्या या वेगवान कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये धास्ती निर्माण झाली असून नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे.
