भर दुपारी शेतात काम ठरले जीवघेणे ४९ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू
साईमत /पारोळा / प्रतिनिधी
पारोळा तालुक्यातील शिरसोदे गावात उष्माघातामुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. प्रतापराव दत्तू पाटील (वय ४९) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्या आकस्मिक निधनामुळे गावासह परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे.
माहितीनुसार, प्रतापराव पाटील हे रविवारी दुपारच्या सुमारास आपल्या शेतात शेतीची कामे करत होते. दुपारी उन्हाचा कडाका वाढलेला असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. काही क्षणांतच ते शेतात कोसळले. ग्रामस्थांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.
घटनेनंतर त्यांचे पार्थिव धुळे येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर उष्माघातामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे शेतकरी वर्गात चिंता व्यक्त होत आहे.
प्रतापराव पाटील यांच्या पश्चात वृद्ध वडील, पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे. कुटुंबाचा आधारवड हरपल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातील सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे आणि मेहनती शेतकरी म्हणून त्यांची ओळख होती.
जिल्ह्यात पावसाचे आगमन अद्याप अपेक्षेप्रमाणे झाले नसल्याने उष्णतेची तीव्रता कायम आहे. तापमान ४० अंशांच्या आसपास असल्याने शेतकरी व मैदानी काम करणाऱ्या नागरिकांनी दुपारच्या वेळेत विशेष काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
