साईमत न्यूज नेटवर्क –
गुजरातमधील जामनगर येथे एका विवाहित महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून त्याचा मृतदेह औद्योगिक वसाहतीतील इमारतीच्या पायात तब्बल १२ फूट खोल पुरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी, तिचा प्रियकर आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत केल्याचा आरोप असलेल्या आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फर्निचर व्यावसायिक जिग्नेश धर्माभाई मावडिया (वय ३५) हे जामनगर येथे पत्नी पृथ्वी उर्फ भूमीबेन मावडिया यांच्यासोबत राहत होते. पृथ्वीचे निलेश मानसुखभाई कछोटिया याच्याशी कथित प्रेमसंबंध होते. या संबंधात पती अडथळा ठरत असल्याने त्याची हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.
तपासानुसार, ३१ मे २०२४ रोजी आरोपींनी जिग्नेश यांना दारेड GIDC परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या कारखान्याच्या शेडमध्ये दारूच्या पार्टीच्या बहाण्याने बोलावले. तेथे त्यांच्या मद्यात सायनाईड मिसळून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह त्याच ठिकाणी सुमारे १२ फूट खोल खड्ड्यात पुरण्यात आला. त्यावर माती टाकून सुमारे एक फूट जाडीचा सिमेंट-काँक्रीटचा थर देण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
घटनेनंतर जिग्नेश बेपत्ता असल्याबाबत संशय येऊ नये म्हणून पत्नीने नातेवाइकांना ते कामानिमित्त ऑस्ट्रेलियाला गेले असून, तेथील कंपनीत मोबाईल वापरण्यास परवानगी नसल्याचे सांगितले. जवळपास दोन वर्षे हेच कारण सांगून नातेवाइकांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप आहे.
दरम्यान, जिग्नेश यांचा एक चुलत भाऊ ऑस्ट्रेलियाला जाणार असल्याने त्याने जिग्नेश यांचा पत्ता आणि संपर्क क्रमांक मागितला. त्यावेळी पत्नीने टाळाटाळ केल्याने नातेवाइकांना संशय आला. त्यांनी पोलिसांत जाण्याचा इशारा दिल्यानंतर प्रकरण उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.
यानंतर जिग्नेश यांचे भाऊ अशोक मावडिया यांनी २६ जुलै रोजी जामनगर सिटी ‘बी’ डिव्हिजन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सहाय्यक पोलिस अधीक्षक प्रतिभा यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी घटनास्थळी ड्रिल मशीनच्या साहाय्याने काँक्रीट फोडून उत्खनन केले. तेथून मानवी सांगाडा सापडला असून, त्याची न्यायवैद्यकीय तपासणी सुरू आहे.
या प्रकरणी पत्नी पृथ्वी उर्फ भूमीबेन मावडिया, तिचा कथित प्रियकर निलेश मानसुखभाई कछोटिया आणि मृतदेह लपविण्यास मदत केल्याचा आरोप असलेला बलवीर वर्मा यांना अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
