गुप्त माहितीवरून पोलिसांची कारवाई १ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त संशयित वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
साईमत /सावदा, ता. रावेर/ प्रतिनिधी
सावदा शहरातील ख्वाजा नगर परिसरात कत्तलीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या गोवंशाची वाहतूक करणाऱ्या वाहनावर सावदा पोलिसांनी धडक कारवाई केली. पोलिसांनी सापळा रचून एका चारचाकी वाहनासह दोन गोऱ्ह्यांची सुटका केली असून या कारवाईत एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयित वाहन चालकाविरुद्ध विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, सावदा शहरातील वृंदावन मॉलजवळ ख्वाजा नगर भागात गुरुवार, दि. ३० जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ६ वाजेच्या सुमारास एका चारचाकी वाहनातून गोवंशाची अवैध वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित ठिकाणी सापळा रचला.
यावेळी वाहन क्रमांक (एमएच ०२ वायए २६४४) थांबवून तपासणी केली असता, वाहनामध्ये कत्तलीच्या उद्देशाने निर्दयीपणे कोंडून ठेवलेले दोन गोऱ्हे आढळून आले. या गोवंशाची अंदाजे किंमत ४० हजार रुपये असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले चारचाकी वाहन अंदाजे १ लाख रुपये किमतीचे आहे. पोलिसांनी दोन्ही गोऱ्ह्यांसह वाहन ताब्यात घेतले.
वाहन चालकाची चौकशी केली असता त्याच्याकडे गोवंश वाहतुकीसाठी आवश्यक परवाना, वाहनाची कागदपत्रे तसेच वैध ड्रायव्हिंग लायसन्स आढळून आले नाही. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून जप्त केलेली गुरे सुरक्षिततेच्या दृष्टीने गोशाळेत पाठविली.
या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल बबन दगडू तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहन चालक शेख तनवीर शेख खलील (वय २७, रा. ख्वाजा नगर, सावदा, ता. रावेर) याच्याविरुद्ध सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयिताविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९७६ (सुधारणा २०१५) चे कलम ५ (अ), ९, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (ड), (च), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११९ तसेच मोटार वाहन कायदा १९८९ चे कलम ८३/१७७ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड, पोहेकॉ. उमेश पाटील, पोहेकॉ. समीर तडवी, पोना. सुनील सैंदाणे, पोकॉ. मयूर पाटील, पोकॉ. बबन तडवी, पोकॉ. राहुल येवले आणि पोकॉ. विकास जोशी यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
सावदा पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध गोवंश वाहतुकीला मोठा आळा बसला असून नागरिकांकडून पोलिसांच्या तत्पर कारवाईचे कौतुक केले जात आहे.
