साईमत न्यूज नेटवर्क –
विरार (प्रतिनिधी): विरार पश्चिमेतील नारंगी गावात घरगुती वादातून एका २८ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सासऱ्याने दिलेल्या धक्क्यामुळे खाली पडून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी बोळींज पोलिसांनी आरोपी सासऱ्याला अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
मृत महिलेचे नाव प्राची कल्पेश पाटील (वय २८) असे असून ती विरार पश्चिमेतील नारंगी गावातील भगत आळी येथे पती व सासरच्या कुटुंबीयांसह राहत होती. तिच्या पश्चात आठ महिन्यांची मुलगी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी प्राची पाटील आणि तिचे सासरे गणपत पाटील यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला. सासरे शिवीगाळ करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्राचीचा भाऊ विशाल पाटील तिला माहेरी घेऊन जाण्यासाठी तिच्या घरी आला होता.
दरम्यान, प्राचीची आठ महिन्यांची मुलगी गणपत पाटील यांच्या खांद्यावर होती. मुलीला ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात दोघांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यावेळी गणपत पाटील यांनी प्राचीला जोराचा धक्का दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे ती खाली कोसळून तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
जखमी अवस्थेत प्राचीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.
या घटनेप्रकरणी बोळींज पोलिस ठाण्यात गणपत पाटील यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास बोळींज पोलिसांकडून सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे नारंगी गाव परिसरात शोककळा पसरली असून, अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकलीच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
