मागून आलेल्या आयशरची दुचाकीला जोरदार धडक आयशरच्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार ठार एक युवक गंभीर जखमी
साईमत -भडगाव- प्रतिनिधी
भडगाव-चाळीसगाव मार्गावरील तांदुळवाडी फाट्याजवळ मंगळवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात पाचोरा तालुक्यातील एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक युवक गंभीर जखमी झाला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रकने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या घटनेमुळे भडगाव-पाचोरा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव धनराज भगवान निकुंभ (रा. घुसर्डी, ता. पाचोरा) असे आहे. तर प्रशांत पंडित एरंडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आयशर चालकाविरुद्ध भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार दि. २८ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भडगाव-चाळीसगाव मार्गावरील तांदुळवाडी फाट्याजवळ हा अपघात झाला. अरबाज शाफिक मन्यार (रा. यशवंत नगर, भडगाव) हा एमएच-५४-०१३१ क्रमांकाचा आयशर ट्रक घेऊन जात असताना त्याने पुढे चाललेल्या एमएच-१९-डीयू-४१९५ क्रमांकाच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील धनराज निकुंभ यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालक प्रशांत एरंडे हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत जखमी प्रशांत यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी चाळीसगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृत धनराज निकुंभ यांच्या काका पंडित शामजी निकुंभ (रा. घुसर्डी, ता. पाचोरा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आयशर चालक अरबाज शाफिक मन्यार याच्याविरुद्ध भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघाताचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे करीत आहेत. दरम्यान, भडगाव-चाळीसगाव मार्गावर वाहनांचा वाढता वेग आणि निष्काळजीपणामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. धनराज निकुंभ यांच्या निधनाने घुसर्डी गावावर शोककळा पसरली आहे.
