वेळोदेतील ट्रक ड्रायव्हरचा मुलगा झाला ‘फौजदार’

0
37

साईमत, धानोरा, ता.चोपडा : वार्ताहर

येथून जवळील वेळोदे गावातील ट्रक चालक बंशीलाल आत्माराम पारधी यांचा मुलगा शुभमने कुठल्याही प्रकारचे क्लासेस न लावता घरीच ऑनलाईन व ऑफलाइन अभ्यास करून २०२१ मध्ये प्रीलियम व २०२२ मेन्स परीक्षा पास करून नुकत्याच १२ तारखेला लागलेल्या निकालात पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती मिळविली. त्यामुळे ट्रक ड्रायव्हरचा मुलगा आता पीएसआय अर्थात ‘फौजदार’ झाला आहे. शुभमच्या यशाबद्दल त्याच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

येथून जवळील वेळोदे हे गाव जळगाव-धुळे जिल्ह्याच्या सीमेवरील अनेर नदीच्या काठी वसलेले तीन हजार लोकवस्तीचे गाव आहे. गावात सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने वास्तव्याला आहेत. गावात पारधी समाजाचे जवळपास १०० च्यावर कुटुंब वास्तव्यास आहेत. त्यापैकी बंशीलाल आत्माराम पारधी हे दहावीपर्यंतचे शिक्षण घेऊन ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करून आपल्या परिवाराचा चरितार्थ चालवित आहेत. कुटुंबात शुभम हा मोठा आणि दोन मुली आहेत. शुभमचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत व माध्यमिक शिक्षण घोडगाव येथील सी.बी.निकुम हायस्कुलमध्ये झाले. दहावीत त्यांने द्वितीय क्रमांक पटकाविला होता. तसेच बारावीपर्यंतचे शिक्षण महात्मा गांधी महाविद्यालय, चोपडा येथे झाले. बीएससीपर्यंतचे शिक्षण शिरपूर येथील एसपीडीएम कॉलेज येथे पूर्ण केले. २०२० मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण करून एमपीएससीच्या अभ्यासाला सुरुवात केली. कुठल्याही प्रकारचे क्लासेस न लावता घरीच ऑनलाईन व ऑफलाइन अभ्यास करून २०२१ मध्ये प्रीलियम व २०२२ मेन्स परीक्षा पास करून नुकत्याच १२ तारखेला लागलेल्या निकालात पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती मिळविली.

आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी आई-वडिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी कुठल्याही प्रकारची आर्थिक उणीव भासू दिली नाही. कुटुंबात लक्ष्मीचा वरदहस्त कमी असला तरी सरस्वतीचा वरदहस्त मात्र चांगलाच राहिलेला आहे. शुभमपेक्षा लहान असलेली त्याची बहीण शुभांगी हिने सी.बी.निकुम हायस्कुल, घोडगाव येथे बारावीत प्रथम क्रमांक पटकाविला. डीएडचे शिक्षण पूर्ण करून त्याच शाळेत इंग्लिश मीडियमला शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. लहान बहिण श्रुती ही चोपडा येथे बीसीएचे शिक्षण पूर्ण करीत आहे.

शुभमने गावातील एमपीएससीच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श घालुन दिला आहे. कुठल्याही प्रकारचे क्लासेस न लावता एमपीएससी पूर्ण करता येते, हे दाखवून दिले आहे. मुलांच्या शिक्षणासाठी आई सुनंदाबाई यांनीही परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे शुभमने आपल्या यशाचे सर्व श्रेय आई-वडिलांना दिलेले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पोलीस उपनिरीक्षक पदासाठीचा निकाल १२ एप्रिल २०२४ रोजी जाहीर करण्यात आला. निकालात पोलीस उपनिरीक्षकपदी शुभमची निवड झाली. निकाल जाहीर झाल्यापासून नातेवाईक, मित्र परिवार तसेच ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव झाला. त्याच्या यशात आई-वडिलांचा मोलाचा वाटा आहे.तेच शुभमचे प्रेरणास्त्रोत आहेत. त्याचे वडील ट्रक चालक आहेत आणि आई गृहिणी आहे.

पहिल्याच प्रयत्नात घातली गवसणी

शुभमने स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील प्रवासाला गेल्या एप्रिल २०२० पासून सुरवात केली. त्याने अभ्यासासाठी पुणेसारखे ठिकाणी न जाता गावातच घरी राहून तयारी केली. त्याने पहिल्याच प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. वेळेचे अचूक व्यवस्थापन आणि अभ्यासात सातत्यपूर्ण प्रयत्न केले. कोणताही न्यूनगंड न बाळगता आत्मविश्‍वास ठेवून अभ्यास केला. सोशल मीडिया हा अभ्यासात सर्वात मोठा अडथळा असतो. तयारीच्यावेळी शुभम सोशल मीडियासारख्या गोष्टीपासून अलिप्त राहिला. कदाचित एवढ्या लवकर यश संपादन करण्यामागे हे एक कारण असावे.

आपल्या आयुष्याचा वेळ हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आपला वेळ सत्कारणी लावून समाजात आपण काही योगदान देऊ शकलो तर यापेक्षा अधिक आनंद आपल्याला कशाचाही होणार नाही, असे शुभम पारधी (पोलीस उपनिरीक्षक २०२१) याने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here