साईमत न्यूज नेटवर्क –
दिल्ली : देशातील शिक्षण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून दरवर्षी लाखो पदवीधर बेरोजगार राहात असल्याचा गंभीर आरोप करत ‘कॉकरोच जनता पार्टी (CJP)’ या डिजिटल चळवळीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी केंद्र सरकारवर तीव्र टीका केली आहे. जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनाला केवळ सुरुवात मानत आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
पत्रकार परिषदेत बोलताना दीपके म्हणाले की, “दरवर्षी देशात सुमारे ५० लाख तरुण पदवीधर होतात, मात्र त्यापैकी सुमारे २० लाखांनाच नोकऱ्या मिळतात. उर्वरित लाखो तरुण बेरोजगार राहतात. गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण आणि रोजगाराऐवजी राजकारण धर्माच्या आधारावर चालले आहे, ज्याचा थेट परिणाम तरुणांच्या भविष्यावर होत आहे.”
पेपर लीक आणि परीक्षा व्यवस्थेतील गोंधळावर टीका करताना त्यांनी NEET आणि CBSE परीक्षांतील अनियमिततांचा मुद्दा उपस्थित केला. “खासगी क्षेत्रात छोट्या चुकीवरही कारवाई होते, मग सरकारी परीक्षांतील पेपरफुटी आणि गोंधळानंतर जबाबदारी का निश्चित होत नाही? जोपर्यंत उत्तरदायित्व ठरवले जात नाही, तोपर्यंत शिक्षण व्यवस्था सुधारू शकत नाही,” असे ते म्हणाले.
आंदोलनाला बदनाम करण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप करत त्यांनी काही राजकीय आणि आयटी सेलवर टीका केली. “सरकारवर प्रश्न विचारणाऱ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. आंदोलनात देशभरातील तरुण सहभागी झाले होते,” असा दावा त्यांनी केला.
हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, “ही युवकांची स्वतंत्र चळवळ आहे. पाच वर्षांतून मतदान करणे म्हणजे राजकारण नव्हे, तर सतत प्रश्न विचारणे हेच खरे राजकारण आहे.”
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका विधानावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच महाराष्ट्रात लवकरच छत्रपती संभाजीनगर येथे मोठे आणि शांततापूर्ण आंदोलन आयोजित केले जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
दरम्यान, या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून युवकांच्या बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेवरील प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत.
