मध्यरात्रीच्या कारवाईत गोंधळ ३० अधिकाऱ्यांसमोरच डंपर पळवून नेल्याचा आरोप वाळू माफियांचे धाडस
साईमत/दापोरा (ता. जळगाव) / प्रतिनिधी :
जळगाव तालुक्यातील दापोरा आणि धानोरा शिवारात अवैध रेती उत्खननाविरोधात मंगळवारी मध्यरात्री महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई केली. मात्र या कारवाईदरम्यान वाळू माफियांनी थेट प्रशासनालाच आव्हान दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. घटनास्थळी सुमारे ३० अधिकारी व कर्मचारी उपस्थित असतानाही काही डंपर पळवून नेण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत असून, या घटनेमुळे संपूर्ण प्रशासनिक यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोरा व धानोरा परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानंतर महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त पथक तयार करून मध्यरात्री अचानक छापेमारीची कारवाई सुरू केली.
कारवाईदरम्यान काही डंपर ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असतानाच घटनास्थळी गोंधळ निर्माण झाला. या गोंधळाचा फायदा घेत वाळू माफियांच्या साथीदारांनी प्रशासनाच्या उपस्थितीतच काही डंपर घटनास्थळावरून पळवून नेल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.
याच वेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थही घटनास्थळी उपस्थित होते. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, काही संशयितांनी तलवार, कुऱ्हाड आणि चॉपर यांसारखी धारदार शस्त्रे दाखवत परिसरात दहशत निर्माण केली. काहींनी नागरिकांच्या दिशेने धाव घेत भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचेही स्थानिकांनी सांगितले.
या संपूर्ण घटनेनंतर परिसरात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोलीस व महसूल यंत्रणा उपस्थित असूनही वाळू माफियांना डंपर घेऊन पसार होण्याची हिंमत कशी झाली, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणी प्रशासनाकडून अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र या घटनेनंतर दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच अवैध रेती उत्खननावर कायमस्वरूपी आळा घालावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच वाळू माफियांच्या वाढत्या दादागिरीविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
