साईमत/ न्यूज नेटवर्क/ यावल :
शहरात मुख्य रस्त्यांवर बेकायदा अतिक्रमण, बेशिस्त वाहतूक आणि पार्किंग, गुन्हेगारी, अवैध धंद्यात झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे यावल शहरासह परिसराचा जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था, शांतता धोक्यात आली आहे. एखाद्या वेळेस फार मोठी अप्रिय घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात शांतता समितीच्या सदस्यांनी ठोस निर्णय घेऊन सदस्यांनी शहराच्या शांततेसाठी हिताचा ठराव करून संबंधित अधिकाऱ्यांकडे पुढील कार्यवाहीसाठी देण्याची गरज आहे. असे न झाल्यास संपूर्ण यावलकरांना त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतील, असे संपूर्ण यावल शहरासह तालुक्यात चर्चिले जात आहे.
यावल पोलीस स्टेशनला ६५ संख्याबळ मंजूर आहे. मात्र, त्यापैकी २४ पोलीस अंमलदार कमी आहे. पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील अनेक गावांमधील बहुतांश गुन्ह्यांचा तपास चौकशी करण्याकामी तसेच दैनंदिन कामकाजात केवळ ४१ संख्याबळ असलेले पोलीस दररोज काय-काय कामे करतील? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. पर्यायी पोलिसांच्या कामकाजावर विपरित परिणाम झाला आहे. त्यांना त्यांच्या कार्यक्षमतेच्या बाहेर कामकाज करावे लागत आहे.
पोलिसांचे मंजूर संख्याबळ वाढवा
कायदा व सुव्यवस्था, शांतता व जातीय सलोखा कायम राहण्याकामी लोकप्रतिनिधी, समाजसेवक, शांतता समिती सदस्यांनी आपले लक्ष केंद्रित करून शासन स्तरावरून यावलला पोलीस मनुष्यबळ कसे वाढविता येईल, यासाठी प्रयत्नांची गरज आहे. यावल पोलिसांना मंजूर संख्याबळ मिळाले तर पोलिसांवरील कामाचा बराच ताण कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.