विचखेडा गावाच्या अलीकडे कारवरील चालकाचा ताबा सुटला
साईमत/पारोळा/विशेष प्रतिनिधी
येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील विचखेडे गावाच्या अलीकडे धुळ्याकडे जाणारी स्विफ्ट कारच्या चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला सुमारे पाचशे फूट फेकली जाऊन चार वेळा उलटली. त्यात कारमधील दोघांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. राहुल भाऊसाहेब अहिरे (वय २८) आणि निलेश सुरेश पाटील (वय २३, रा. तरवाडे, जि. धुळे) असे मृतांची नावे आहेत. दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
सविस्तर असे की, पारोळाकडून धुळ्याकडे जाणारी स्विफ्ट कारमध्ये निलेश पाटील, गोविंद भास्कर राडोड (वय २४, रा. तरवाडे), राहुल अहिरे असे तिघे आणि महेश आत्माराम पाटील (वय २१, रा. मोंढाळे प्र. अ., ता. पारोळा) हे धुळ्याकडे भरधाव वेगाने जात होते. तेव्हा पारोळा शहरानजीकच्या विचखेडा गावाच्या अलीकडे कारवरील चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे कार रस्त्याच्या कडेला चार वेळा उलटून पाचशे फुटावर थांबली.
त्यात राहुल पाटील याचा जागीच मृत्यू झाला तर निलेश पाटील याला उपचारासाठी धुळे येथे नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. महेश देवरे आणि गोविंदा वंजारी हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना १०८ रुग्णवाहिका व महामार्गाची १०३३ व नरेंद्राचार्य महाराज यांच्या मोफत रुग्णवाहिकेत पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. त्यातील गोविंदा राठोड यांनाही धुळे येथे हलविण्यात आले आहे.