‘पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय’ खात्याचा आता नवा आकृतीबंध
अतिरिक्त ठरणारे कर्मचारी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्समध्ये जाणार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)-
राज्य सरकार पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाची पुनर्रचना व पदांचा सुधारित आकृतीबंध तयार करणार आहे. यामुळे पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागात अतिरिक्त ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांचे समायोजन नव्याने निर्माण होणाऱ्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्समध्ये करण्यात येणार आहे हे आदेश गृह विभागाचे उपसचिव रा. ता. भालवणे यांनी काढले आहे
राज्यातील पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे एकत्रीकरण अंतिम टप्प्यात असून यापुढे हे तीनही विभाग एकत्रित कार्यरत राहणार आहेत. केंद्र सरकारने प्रत्येक राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. सुधारित आकृतीबंधानंतर अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे त्यांच्या शैक्षणिक पात्रता व पदाच्या जबाबदारीनुसार समायोजन करण्यास सरकारने मान्यता दिली आहे.
जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग, शासकीय दूध डेअरी आणि जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयांचा कारभार राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच छताखालून चालणार आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या धर्तीवर जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्त हे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नियंत्रणात येणार आहेत. तालुका स्तरावर पशूसंवर्धन अधिकारी यांच्या नियंत्रणात जनावरांच्या आरोग्यासह तालुक्यात उत्पादन होणारे दूध, दुग्धजन्य पदार्थाचे नियंत्रण यासह पशूखाद्य कारखाने राहणार आहे. जिल्हा परिषद पशुसंवर्धन सभापतींकडे या सर्व विभागाचा कारभार देण्यात येणार आहे.
ग्रामीण भागात पशुवैद्यकीय दवाखाने नावाने परिचित असलेल्या दवाखान्यांना यापुढे व्हेेटरनरी क्लिनिक असे नाव असणार आहे. या ठिकाणी एमपीएसपीमधून डॉक्टरांची निवड करण्यात येणार आहे.