यंदा जि. प. शाळांची उन्हाळी सुटी रद्द
अहिल्यानगर (प्रतिनिधी)-
जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शिक्षकांना यावर्षी उन्हाळी सुट्टीतही विद्यार्थ्यांचा अभ्यास घ्यावा लागणार आहे. दर आठवड्यात विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यांकन करून 30 जूनपूर्वी प्रत्येक विद्यार्थी भाषा आणि संख्याशास्त्र ज्ञानात परिपूर्ण करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या वतीने यंदा राज्यातील दुसरी ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविण्याचे निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे यंदा सुट्टीतही शिक्षकांना विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अथवा ऑफलाईन अध्यापन करावे लागणार आहे.
या उपक्रमातील दुसरी ते पाचवीच्या प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांची किमान 75 टक्के भाषा आणि अध्ययन क्षमता परिपूर्ण करण्याचे ध्येय आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, सर्व अनुदानित, खाजगी प्राथमिक, अंशतः अनुदानित शाळांमध्ये हा उपक्रम सक्तीचा असून सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी ऐच्छिक आहे. हा उपक्रम सर्व जिल्ह्यात 5 मार्च ते 30 जून या चार महिन्यांच्या कालावधीत राबवण्यात येणार आहे.
निपुण भारत उपक्रमात प्रगत विद्यार्थ्यांची क्षमता व प्रगती तपासण्यासाठी चावडी वाचन व गणन कार्यक्रमाच्या सूचना शालेय शिक्षण विभाग पातळीवरून देण्यात आल्या आहेत.
विहित कालावधीत अपेक्षित अध्ययन स्तर गाठणार्या शाळा व शिक्षकांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. ज्या शाळा अपेक्षित उद्दिष्ट साध्य करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. उपक्रमात शाळा व्यवस्थापन समितीलाही सहभागी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मार्चपासून तपासणीला सुरूवात करण्यात आली आहे. अप्रगत विद्यार्थ्यांना पुढील वर्गात ढकलणे बंद होऊन अभ्यासाची तयारी करूनच नव्या वर्षात प्रवेश करावा लागणार आहे.