साईमत जळगाव प्रतिनिधी
टीआर -१ , टीआर – ४ (फ्युसारियम विल्ट) हा एक विषाणूजन्य रोग असल्याने एकदा संसर्ग झाल्यानंतर किमान ३० वर्षे मातीत अस्तित्व राखणारा हा विषाणू त्या परिसरातून केळी नष्ट करून टाकतो. तसेच तो मातीतून मुळांमध्ये प्रवेश करतो व खोडातील पाणी तसेच पोषक तत्वांवर मारा करुन केळी पूर्ण नष्ट करतो. जगभरात अत्यंत घातक विषाणू अशी त्याची ओळख आहे. जगभरातील केळी उत्पादनासाठी हा रोग सर्वात मोठा धोका आहे. ज्या-ज्या राज्यांत या विषाणूचा शिरकाव झाला आहे तेथील केळी पूर्णपणे नष्ट झाली आहे, त्यामुळे जळगाव जिल्ह्यात या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्यासंदर्भात भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन निवेदना द्वारे मागणी केली आहे.
टीआर -१ , टीआर – ४ ( फ्युसारियम विल्ट) या विषाणूजन्य रोगाने चीनमधून नेपाळमार्गे भारतातील बिहार, उत्तरप्रदेश, तमिळनाडू ,गुजरात इत्यादी राज्यांपर्यंत शिरकाव केला आहे. ज्या राज्यांत याचा शिरकाव झाला आहे तेथील केळी पूर्णपणे नष्ट झाल्यामुळे शेतकरी हवालदील होऊन दुसऱ्या पिकाकडे वळला आहे. त्यामुळे केळीचे क्षेत्र जगभरात झपाट्याने घटत आहे. ज्या नेपाळमधून हा विषाणू भारतात आला त्या नेपाळमधील कृषी मंत्रालयाने त्यांच्या देशात त्याचा प्रसार रोखण्यासाठी आधीच खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत.
नेपाळने हा संसर्ग रोखण्यासाठी भारताच्या सीमेवर कॉरंटाइन सेंटर उभारून चोख व्यवस्था केली आहे. भारतीय केळीच्या संपूर्ण चाचण्या झाल्याशिवाय आणि वाहनांच्या चाकाचे निर्जंतुकीकरण केल्याशिवाय वाहने नेपाळमध्ये जाऊ शकत नाहीत. तो देश या रोगाकडे राष्ट्रीय संकट म्हणून पाहतो आहे. जळगाव जिल्हा हा निर्यातक्षम केळीच्या उत्पादकांपैकी एक असल्यामुळे या विषयाकडे लक्ष देणे अत्यंत महत्वाचे आहे. संसर्गजन्य भागातून येणाऱ्या वाहनांच्या चाकाला लागलेली माती, मजुरांच्या चप्पल, बुटांना लागून येणाऱ्या मातीतून या रोगाच्या विषाणूचा सहज संसर्ग होऊ शकतो. त्यामुळें बाधित भागातून येणाऱ्या वाहनाच्या चाकांचे निर्जतुकीकरण करून या रोगाचा प्रादुर्भाव कमी केला जाऊ शकतो. या संदर्भात तातडीच्या उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक असून प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देण्याची विनंती भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना या पत्राद्वारे केली आहे.