साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी
तालुक्यातील वढवे, चिखली, बेलसवाडी, पिंपरी नांदू अशा चार ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक, राजुरा, निमखेडी खुर्द या तीन ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुका नुकत्याच झाल्या आहेत. निवडणूक लढविलेल्या तसेच बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांसाठी ग्रामपंचायत निवडणुकीचा सार्वत्रिक तसेच पोटनिवडणुकीचा खर्च सादर करण्यासाठी मुक्ताईनगर तहसील कार्यालयात मंगळवारी, २१ नोव्हेंबर रोजी कॅम्पचे आयोजन केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या संदर्भिय पत्रान्वये, सद्यस्थितीत ग्रामपंचायत सार्वत्रिक, पोटनिवडणुकीचे कामकाज पूर्ण झालेले आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने (बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांसहित) निवडणुकीचे निकाल घोषित केल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत विहित पध्दतीने निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करणे आवश्यक आहे.
खर्च सादर करण्यासाठी संबंधित उमेदवारांनी टु वोटर ॲपचा वापर करणे अनिवार्य केलेले आहे. यासाठी गुगल/ॲपल प्लेस्टोअरवरुन टु वोटर ॲप डाऊनलोड करुन त्याद्वारे खर्चाचा हिशोब सादर करण्याबाबत निर्देश दिलेले आहे. आपल्या अधिनस्त असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत तालुका स्तरावर मंगळवारी, २१ नोव्हेंबर रोजी कॅम्पचे आयोजन तहसील कार्यालयात केले आहे. कॅम्पमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उमेदवारांचा निवडणूक खर्च सादर करुन घ्यावयाचा आहे. याशिवाय उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करतांना येणाऱ्या अडचणीबाबत मार्गदर्शन करावयाचे आहे, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तहसीलदारांना कळविलेले आहे.