साईमत न्यूज नेटवर्क –
लखनऊ उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील अलीगंज परिसरातील पुरनिया चौकाजवळ असलेल्या एका कोचिंग सेंटरमध्ये सोमवारी भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. आगीतून सुटका करण्यासाठी सात ते आठ विद्यार्थ्यांनी इमारतीवरून खाली उड्या मारल्याची माहिती समोर आली आहे. तर २० ते २५ विद्यार्थी आत अडकल्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली असल्याचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे.
आग लागल्यानंतर काही क्षणांतच संपूर्ण इमारतीत दाट धूर पसरला. त्यामुळे कोचिंग सेंटरमध्ये उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये घबराट निर्माण झाली. जीव वाचवण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी इमारतीवरून उड्या मारल्या, तर इतरांनी बाहेर पडण्यासाठी धावपळ केली. परिसरात किंचाळ्या आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. हायड्रॉलिक प्लॅटफॉर्मच्या साहाय्याने बचावकार्य सुरू करण्यात आले असून, अग्निशामक दल आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून अडकलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, एडीसीपी (उत्तर) ट्विंकल जैन, जिल्हाधिकारी विशाख तसेच उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
या दुर्घटनेची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचून बचावकार्य गतिमान करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जखमी विद्यार्थ्यांना त्वरित आणि योग्य वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांनी जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना व्यक्त केली असून प्रशासनाने पूर्ण सतर्कता बाळगून मदतकार्यावर सातत्याने लक्ष ठेवावे, असे आदेश दिले आहेत.
