सध्या ऑनलाइन बुक केलेले आरक्षित तिकीट चार्ट तयार झाल्यानंतरही वेटिंगमध्ये राहिल्यास ते आपोआप रद्द होते. अशावेळी प्रवाशांना परत जनरल तिकीट घेऊन प्रवास करावा लागतो. विशेषतः सणासुदीच्या काळात आणि सुट्ट्यांमध्ये या नियमामुळे अनेक प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो.
मात्र, प्रस्तावित बदल लागू झाल्यास चार्ट तयार झाल्यानंतरही वेटिंगमध्ये असलेले ऑनलाइन तिकीट वैध राहू शकते. अशा तिकिटाच्या आधारे प्रवाशांना जनरल डब्यात प्रवास करण्याची परवानगी देण्याचा पर्याय रेल्वे प्रशासन विचाराधीन ठेवत असल्याचे सांगितले जात आहे.
सध्याच्या नियमानुसार, ऑनलाइन वेटिंग तिकीट आपोआप रद्द झाल्यानंतर त्यावरील कर आणि इतर शुल्क वजा करून उर्वरित रक्कम प्रवाशांच्या खात्यात परत केली जाते. दुसरीकडे, आरक्षण काउंटरवरून घेतलेल्या वेटिंग तिकिटांसह प्रवाशांना जनरल डब्यात प्रवास करता येतो.
भारतीय रेल्वेच्या एकूण आरक्षणांपैकी सुमारे 85 टक्के तिकिटे ऑनलाइन बुक केली जातात. त्यामुळे हा बदल अमलात आल्यास मोठ्या संख्येने प्रवाशांना त्याचा लाभ मिळू शकतो. वेटिंग तिकीटामुळे प्रवास रद्द करण्याची वेळ येणाऱ्या किंवा पुन्हा स्वतंत्र जनरल तिकीट खरेदी कराव्या लागणाऱ्या प्रवाशांसाठी हा निर्णय मोठा दिलासा ठरू शकतो.
