चित्रकला महाविद्यालयाची विद्यार्थी शिक्षकांनी सांभाळली ‘धुरा’

0
17


साईमत, चोपडा : प्रतिनिधी

येथील भगिनी मंडळ चित्रकला महाविद्यालयात नुकताच शिक्षक दिन साजरा झाला. विद्यार्थी शिक्षकांनी दिवसभर महाविद्यालयाची ‘धुरा’ सांभाळली. विद्यार्थी प्राचार्य विनल गुजर, शिक्षक कोमल पाटील, जागृती पवार, सागर नाथबुवा, लिपीक जीत भदाणे, शिपाई विवेक पाटील यांनी आपल्या भूमिका चोख पार पाडत सर्व प्राचार्य, शिक्षक, लिपीक, शिपाई यांना आराम दिला. विद्यार्थी प्राचार्यांनी पूर्ण दिवसाचे नियोजन करत सगळ्या अडचणी पार पाडल्या. शिक्षक व विद्यार्थी शिक्षक यांच्या हस्ते श्री सरस्वती देवी व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमांचे पूजन झाले.

दुपारी ए.टी.डी. द्वितीय वर्ष वर्गातील विद्यार्थ्यांनी तयार केलेले ‘स्पंदन भित्तिपत्रका’चे ज्येष्ठ कलाशिक्षक विजय पाटील महिला मंडळ माध्य.विद्यालय, चोपडा यांच्या हस्ते अनावरण झाले. याप्रसंगी विजय पाटील यांनी ३२ वर्ष शिकविण्याचा प्रदीर्घ अनुभव सांगत मनोगत व्यक्त केले. प्राचार्य सुनील बारी यांनी अधिकाधिक सर्जनशील काम कसे होईल याकडे लक्ष द्यावे, निरीक्षण शक्ती वाढवावी. प्रत्येक उपक्रमात भाग घेत रहा असे सांगितले. तसेच सागर नाथबुवा, पल्लवी मराठे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. नंतर प्रा. संजय नेवे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. उपक्रमात क्षेत्र मनुदेवी व परिसर येथे आयोजित शैक्षणिक सहलीत केलेल्या अभ्यास चित्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले.

प्रदर्शनातील विजयी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र

प्रदर्शनात ए.टी.डी. प्रथम वर्षातून कृष्णा उमेश पाटील प्रथम तर अनुज अनिल बडगुजर द्वितीय, ए.टी.डी. द्वितीय वर्षातून प्रमोद महेश वारुळे प्रथम तर सुरेश छगन बारेला द्वितीय, जी. डी. आर्ट अंतिम वर्षातून अर्चना वनसिंग वसावे प्रथम तर पल्लवी विवेक मराठे द्वितीय आले. यासोबतच उत्कृष्ट फोटोग्राफी म्हणून कुणाल पाटील (अमळनेर) या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. ‘स्पंदन भित्तिपत्रका’चे लिखाण दिव्या सैतवाल, मांडणी सुरेश बारेला, चित्र रेखाटन प्रमोद वारुळे तर सजावट कोमल पाटील यांनी केली. यशस्वीतेसाठी लिपीक भगवान बारी, शिपाई अतुल आडावदकर, प्रवीण मानकरी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here