चिमुरडीवरील अत्याचारानंतर चोपड्यात जनआक्रोश मोर्चा
साईमत/ चोपडा / प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथे निष्पाप चिमुरडीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेचे तीव्र पडसाद चोपडा शहरासह तालुक्यात उमटले आहेत. या हृदयद्रावक घटनेच्या निषेधार्थ चोपडा बहुभाषिक ब्राह्मण संघटनेच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत संताप व्यक्त केला.
“नराधमाला फाशी झालीच पाहिजे!” या संतप्त घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. मोर्चामध्ये संघटनेचे पदाधिकारी, विविध सामाजिक स्तरातील कार्यकर्ते तसेच बहुभाषिक ब्राह्मण समाजातील महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. सहभागी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर संताप आणि वेदना स्पष्टपणे दिसून येत होत्या.
या वेळी चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन देसले तसेच तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनात या अमानुष घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
तसेच, या प्रकरणाचा निष्पक्ष व सखोल तपास व्हावा यासाठी स्वतंत्र विशेष तपास पथक (SIT) नेमण्यात यावे, तसेच खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. समाजाच्या सर्व स्तरातून एकच मागणी जोर धरत आहे — “या क्रूरतेला आता कठोर उत्तर मिळालेच पाहिजे!”
