साईमत न्यूज नेटवर्क –
कल्याण : कल्याण पश्चिमेतील संदीप हॉटेल परिसरात एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने अक्षरशः धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संदीप हॉटेल ते खडकपाडा या मार्गावर ये-जा करणाऱ्या तब्बल १२० ते १३० नागरिकांना या कुत्र्याने चावा घेतल्याची माहिती समोर आली असून, या घटनेने परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांनी उपचारासाठी महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात धाव घेतली. जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात येत असून, अचानक मोठ्या संख्येने नागरिक उपचारासाठी दाखल झाल्याने रुग्णालयातही मोठी गर्दी झाली.
या हल्ल्यात ११ वर्षीय अंकिता या चिमुकलीलाही कुत्र्याने गंभीर जखमी केले. तिच्यावर रुक्मिणीबाई रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर प्रकृती अधिक गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी मुंबईतील सायन रुग्णालयात हलविण्यात आले. याबाबतची माहिती डॉ. संदीप पगारे यांनी दिली.
या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रस्त्यावरून ये-जा करताना नागरिकांना कुत्र्यांच्या हल्ल्याची भीती निर्माण झाली असून, महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच नसबंदी मोहिमेसाठी कल्याण-डोंबिवली महापालिका दरवर्षी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करते. मात्र, त्यानंतरही भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. एका कुत्र्याच्या हल्ल्यात एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक जखमी झाल्याने महापालिकेच्या उपाययोजनांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रुग्णालयाच्या आवारातही भटक्या कुत्र्यांचा वावर
दरम्यान, जखमी नागरिकांवर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या आवारातही भटके कुत्रे मुक्तपणे फिरत असल्याचे चित्र यापूर्वी समोर आले होते. रुग्णालय परिसरातील भटक्या कुत्र्यांचा वावर दर्शविणारा व्हिडिओही काही दिवसांपूर्वी चर्चेत आला होता. त्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात येणारे नागरिक आणि त्यांचे नातेवाईकही सुरक्षिततेबाबत चिंतेत आहेत.
एकीकडे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिक जखमी होत असताना दुसरीकडे महापालिकेच्या रुग्णालयाच्या आवारातच भटक्या कुत्र्यांचा वावर असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. भटक्या कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करून नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासन ठोस पावले कधी उचलणार, असा सवाल कल्याणकरांकडून उपस्थित केला जात आहे.
