रस्त्यावरून जाणाऱ्या कंटेनरवर कोसळल्याने वाहनाचे नुकसान; मोठी दुर्घटना थोडक्यात टळली
साईमत /नवी मुंबई/ प्रतिनिधी :
वाशी सेक्टर २६, कोपरी परिसरातील सिडबी ऑफिसर्स क्वार्टर्सच्या बांधकामस्थळी काम सुरू असताना टेलिस्कोपिक मोबाइल क्रेन अचानक असंतुलित होऊन मुख्य रस्त्यावर कोसळल्याची घटना रविवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली. याचवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या कंटेनरवर क्रेन कोसळल्याने कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, चालकाला किरकोळ दुखापत झाली. रात्रीची वेळ असल्याने रस्त्यावर वाहनांची वर्दळ तुलनेने कमी होती. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
कोपरी येथील पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस सिडबी ऑफिसर्स क्वार्टर्सचे बांधकाम सुरू आहे. सबरी कन्स्ट्रक्शनच्या वतीने सुरू असलेल्या या बांधकामासाठी टेलिस्कोपिक मोबाइल क्रेनचा वापर करण्यात येत होता. रविवारी रात्री बांधकामाचे काम सुरू असतानाच अचानक क्रेन असंतुलित झाली. काही क्षणांतच ती मुख्य रस्त्याच्या दिशेने कोसळली.
त्याचवेळी या मार्गावरून एक कंटेनर जात होता. क्रेन थेट कंटेनरवर आदळल्याने वाहनाचे नुकसान झाले. या घटनेत कंटेनरचालकाला किरकोळ दुखापत झाली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ घबराट निर्माण झाली. बांधकामस्थळी उपस्थित कामगारांनी तातडीने मदतकार्य सुरू करून रस्त्यावर पडलेली क्रेन हटविण्याचे काम केले. त्यामुळे वाहतुकीला निर्माण झालेला अडथळा काही वेळात दूर करण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनेची माहिती घेतली. जखमी कंटेनरचालकाच्या जबाबाच्या आधारे संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी दिली.
दरम्यान, क्रेन नेमकी कोणत्या कारणामुळे असंतुलित झाली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बांधकामस्थळी अवजड यंत्रसामग्री वापरताना आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, क्रेनचा वापर नियमानुसार होत होता का, तसेच दुर्घटनेला नेमके कोण जबाबदार आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
या घटनेनंतर बांधकामस्थळावरील सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुख्य रस्त्यालगत अवजड यंत्रसामग्रीचा वापर करताना वाहनचालक, पादचारी तसेच परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे बांधकामस्थळी सुरक्षा नियमांचे पालन केले जात होते का, याबाबत प्रशासनाकडूनही गांभीर्याने पाहणी होण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
