साईमत न्यूज नेटवर्क –
शिरूर नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीलगत असलेल्या अंगणवाडीच्या परिसरात जादूटोण्यासदृश वस्तू आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. अंगणवाडीत शिक्षणासाठी येणाऱ्या चिमुकल्यांच्या सुरक्षेबाबत पालकांमध्ये चिंता निर्माण झाली असून, या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण होते.
घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. अंगणवाडीच्या आवारात आढळलेल्या संशयास्पद वस्तूंची पाहणी करून पोलिसांनी परिस्थितीची माहिती घेतली. या घटनेमागे नेमका कोणाचा हात आहे, याबाबत सध्या स्पष्टता नसून, पोलीस या प्रकाराची चौकशी करीत आहेत.
दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रतिनिधींनीही घटनास्थळी भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. समितीच्या कार्यकर्त्यांनी पालक व स्थानिक नागरिकांशी संवाद साधत अशा प्रकारच्या घटनांकडे अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून न पाहता शांतता राखण्याचे आवाहन केले. केवळ काही संशयास्पद वस्तू आढळल्यामुळे त्याला भानामती किंवा जादूटोण्याचे स्वरूप देणे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अंगणवाडीच्या परिसरात असा प्रकार घडल्याने चिमुकल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात आली आहे. मुलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाने पार पाडावी, अशी अपेक्षाही पालकांनी व्यक्त केली.
पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. परिसरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून, अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींवरही लक्ष ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या क्रांती पैठणकर यांनीही पालकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सांगितले. अशा घटनांमुळे निर्माण होणाऱ्या मानसिक भीतीला बळी न पडता वस्तुस्थिती समजून घेणे गरजेचे आहे. पालकांनी आपल्या मुलांना निर्भयपणे अंगणवाडीत पाठवावे, असे आवाहन त्यांनी केले.
घटनास्थळी शिरूर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा सभापती सुनीता पोटे, महिला व बालकल्याण सभापती आयेशा सय्यद, लोकजागृतीचे प्रमुख रवींद्र धनक, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या क्रांती पैठणकर व डॉ. वैशाली साखरे, लहुजी शक्ती सेनेचे विशाल जोगदंड, योगेश जामदार यांच्यासह युवराज सोनार, गणेश गायकवाड, आशिष चव्हाण, हरीश अन्सारी आदी स्थानिक कार्यकर्त्यांनी भेट देऊन पाहणी केली.
दरम्यान, या प्रकाराची सखोल चौकशी करून अंगणवाडी परिसरातील सुरक्षितता वाढवावी, तसेच नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या अफवांना आळा घालावा, अशी मागणी होत आहे. प्रशासन व पोलिसांनी नागरिकांनी संयम राखून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले आहे.
