नियंत्रण सुटलेल्या दुचाकीची कठड्याला धडक;तरुणाचा मृत्यू, तरुणी गंभीर जखमी
साईमत /वसई / प्रतिनिधी :
कळंब-निर्मळ मार्गावरील खाडीपुलावर दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात २० वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेली १९ वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली. इब्राहीम मुमताज शेख असे मृत तरुणाचे नाव असून तो नालासोपारा पूर्वेतील बिलालपाडा परिसरात राहत होता. स्नेहा सुरज गायकवाड (१९) असे जखमी तरुणीचे नाव आहे.
ही घटना ९ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली. इब्राहीम शेख हा स्नेहा गायकवाड हिच्यासोबत दुचाकीवरून कळंब-निर्मळ मार्गाने जात होता. कळंब येथील खाडीपुलावर दुचाकी पोहोचताच अचानक त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर दुचाकी पुलाच्या संरक्षक कठड्यावर जोरदार आदळली. या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले.
अपघातात इब्राहीमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर स्नेहाच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच दोघांना तातडीने वसई येथील कार्डिनल ग्रेशियस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुढील उपचारांसाठी वसई महापालिकेच्या सर डी. एम. पेटिट रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, इब्राहीमवर उपचार सुरू असतानाच १० ऑगस्ट रोजी पहाटे १ वाजून ४० मिनिटांनी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे नालासोपारा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताची नोंद अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यू म्हणून करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
