साईमत -चाळीसगाव -प्रतिनिधी |
चाळीसगाव शहरातील बसस्थानक परिसरात दुकान लावण्याच्या कारणावरून सुरू असलेल्या जुन्या वादाचे पर्यावसान एका तरुणाच्या हत्येत झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अक्षय भानुदास पाटील (वय २७, रा. लक्ष्मीनगर, चाळीसगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संशयित आरोपी निखिल ऊर्फ भोला सुनील अजबे याच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत अक्षय पाटील याचे चाळीसगाव बसस्थानकाच्या मागील भागात दुकान लावण्याच्या कारणावरून संशयित निखिल अजबे याच्याशी वारंवार वाद होत होते. गुरुवारी (दि. १८) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास “निखिलने बोलावले आहे” असे सांगून अक्षय घरातून बाहेर पडला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला, परंतु तो कुठेही आढळून आला नाही.
पहाटे पोलिसांचा फोन अन् रुग्णालयात मृत्यूची माहिती
दरम्यान, शुक्रवारी (दि. १९) पहाटे चार वाजेच्या सुमारास पोलिसांनी अक्षयच्या कुटुंबियांना त्याच्यावर हल्ला झाल्याची माहिती दिली. माहिती मिळताच कुटुंबियांनी ग्रामीण रुग्णालय गाठले. त्याठिकाणी अक्षयच्या डोक्यावर आणि तोंडावर गंभीर दुखापती झालेल्या दिसून आल्या. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
घटनास्थळी रक्ताचे थारोळे आणि विटांचे तुकडे
पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळाची पाहणी केली असता, मांगरवाडी वाडा परिसरातील एका पडीक घरासमोर रक्ताचे थारोळे तसेच रक्ताने माखलेल्या विटांचे तुकडे आढळून आले. यावरून संशयित आरोपीने अक्षयवर विटांनी बेदम हल्ला करून त्याचा खून केल्याचा संशय बळावला आहे.
वृद्धापकाळात पित्यावर कोसळला दुःखाचा डोंगर; गुन्हा दाखल
या दुर्दैवी घटनेप्रकरणी मृताचे वृद्ध वडील भानुदास राजाराम पाटील (वय ७५) यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून संशयित निखिल ऊर्फ भोला सुनील अजबे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत (BNS) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमागील नेमके कारण आणि हत्येचा संपूर्ण घटनाक्रम उलगडण्यासाठी चाळीसगाव शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत. या थरारक घटनेमुळे चाळीसगाव शहरात एकच खळबळ उडाली असून परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
