चोरी, घरफोडी, फसवणूक व सायबर गुन्ह्यांतील जप्त मालमत्ता न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून सुपूर्द उत्कृष्ट तपास करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
साईमत /जळगाव /प्रतिनिधी
जळगाव जिल्हा पोलीस दलाने मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या तपासात उल्लेखनीय यश संपादन करत तब्बल २ कोटी १६ लाख ८४ हजार ९३० रुपये किमतीचा जप्त मुद्देमाल न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून संबंधित मूळ मालकांच्या ताब्यात दिला. चोरी, घरफोडी, फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांमधून हस्तगत करण्यात आलेल्या मौल्यवान वस्तू नागरिकांना परत मिळाल्याने पोलीस दलावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
११ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष ‘मुद्देमाल हस्तांतरण मोहिमे’ अंतर्गत हा कार्यक्रम पार पडला. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी, मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलाने सन २०२६ मध्ये मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या तपासावर विशेष भर देत चोरीस गेलेला आणि हरविलेला मुद्देमाल शोधून काढण्यासाठी प्रभावी मोहीम राबविली. गुन्हेगारांवर कायद्याचा धाक निर्माण करणे, पीडितांना न्याय मिळवून देणे आणि चोरीस गेलेली संपत्ती शक्य तितक्या लवकर मूळ मालकांकडे परत पोहोचविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
जळगाव परिमंडळातील विविध पोलीस ठाण्यांनी प्रभावी तपासाच्या जोरावर ७३ लाख ५२ हजार २०८ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. यात ८४ मोबाईल फोन, ३०८.७३ ग्रॅम सोन्याचे दागिने, १८५.४६ भार चांदी, १ लाख ९५ हजार रुपयांची रोख रक्कम, २१ मोटारसायकली, एक चारचाकी वाहन, एक रिक्षा तसेच इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे.
चाळीसगाव परिमंडळानेही तपासातील उत्कृष्ट कामगिरीची नोंद करत १ कोटी १६ लाख १६ हजार २२२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या मुद्देमालामध्ये ३३३ ग्रॅम सोन्याचे दागिने, ९७ भार चांदी, २४ लाख ६८ हजार ६६० रुपयांची रोख रक्कम, ७५ मोबाईल फोन, १५ मोटारसायकली, दोन चारचाकी वाहने, तीन बँक खाती आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे.
सायबर गुन्ह्यांच्या तपासातही जळगाव जिल्हा सायबर पोलीस स्टेशनने उल्लेखनीय यश मिळविले. तांत्रिक कौशल्याचा प्रभावी वापर करून विविध प्रकरणांतील आणि हरविलेल्या २०७ मोबाईल फोनचा शोध घेण्यात आला. २७ लाख ६१ हजार ५०० रुपये किमतीचे हे मोबाईल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित नागरिकांना परत देण्यात आले. या कारवाईमुळे सायबर गुन्ह्यांतील पीडितांना मोठा दिलासा मिळाला असून सायबर पोलिसांच्या कार्यक्षमतेचीही प्रभावी छाप पडली आहे.
यावेळी उत्कृष्ट तपास, न्यायालयीन यश आणि विशेष कामगिरी करणाऱ्या तपास अधिकारी, सरकारी अभियोक्ता, फॉरेन्सिक अधिकारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांचा प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. खून, बलात्कार, पॉक्सो, एटीएम चोरी, अज्ञात मृतदेहांची ओळख, मालमत्तेविरुद्धचे गुन्हे आणि इतर गंभीर स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये वैज्ञानिक तपास, फॉरेन्सिक विश्लेषण, डिजिटल पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींना न्यायालयाकडून कठोर शिक्षा मिळवून देण्यात जिल्हा पोलीस दलाला यश आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमात बोलताना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना कोणताही गुन्हा अथवा संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले. नागरिकांचे सहकार्य, वेळेवर मिळणारी माहिती आणि पोलीस-जनतेतील समन्वय यामुळे गुन्ह्यांचा उलगडा अधिक प्रभावीपणे होतो, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक नागरिकाच्या कष्टाने कमावलेल्या संपत्तीचे संरक्षण करणे ही पोलीस दलाची सर्वोच्च जबाबदारी असून नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि विश्वासार्ह पोलीसिंगसाठी जळगाव जिल्हा पोलीस दल कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
