चार महिन्यांच्या वादाचा घेतला बदला कटरने हल्ला करणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात
साईमत /चाळीसगाव /प्रतिनिधी
शहरातील नगरपालिका शाळा क्रमांक ११ जवळ जुन्या वादाच्या कारणातून एका २६ वर्षीय तरुणावर लोखंडी कटरने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, चाळीसगाव शहर पोलिसांनी तत्परता दाखवत काही तासांतच दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १८ जुलै २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजून ३७ मिनिटांच्या सुमारास चाळीसगाव शहरातील नगरपालिका शाळा क्रमांक ११ जवळील रस्त्यावर घडली. या हल्ल्यात पवारवाडी, कलाल गल्ली, स्टेशन रोड येथील प्रतिक शाम गोल्हार (वय २६) हे जखमी झाले आहेत.
चार महिन्यांपूर्वी झालेल्या एका किरकोळ वादाचा राग मनात धरून आरोपी शुभम मधुकर पाटील आणि अमीर उर्फ बबडी निसार शेख (दोघेही रा. चाळीसगाव) यांनी प्रतिक गोल्हार यांना रस्त्यात अडवले. यावेळी आरोपींनी लोखंडी कटरने त्यांच्या अंगावर जीवघेण्या उद्देशाने वार केले. तसेच दोघांनी मिळून त्यांना बेदम मारहाण केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
हल्ल्यात जखमी झालेल्या प्रतिक गोल्हार यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम १०९, ११५(२), ३५२, ३५१(३), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव शहर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक माहिती व तपासाच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींना १८ जुलै रोजी रात्रीच ताब्यात घेऊन अटक केली. पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे आरोपींना काही तासांतच जेरबंद करण्यात यश आले.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपींकडून हल्ल्याचे नेमके कारण आणि घटनेतील इतर बाबींची चौकशी केली जात आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून पुढील कारवाई करण्यात येत आहे.
