साईमत न्यूज नेटवर्क –
जगभरात पारंपरिक युद्धांपेक्षा ड्रोनचा वापर अधिक प्रभावी ठरत असल्याचे युक्रेन संघर्षासह विविध घटनांमधून स्पष्ट झाले आहे. त्यातच चीनने विकसित केलेल्या अत्यंत सूक्ष्म ‘मच्छर ड्रोन’मुळे नवे सुरक्षा व प्रायव्हसीचे प्रश्न निर्माण झाले आहेत.
चीनच्या नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजी (NUDT) येथे विकसित करण्यात आलेला हा मायक्रो ड्रोन अत्यंत लहान असून त्याचे वजन केवळ ०.३ ग्रॅम इतके आहे. डासासारखा दिसणारा हा ड्रोन नैसर्गिक कीटकासारखा भासावा अशा प्रकारे तयार करण्यात आला असून त्याची रचना आणि पंख पानासारख्या आकाराचे आहेत.
या ड्रोनमध्ये अतिशय सूक्ष्म सेन्सर्स बसवण्यात आले आहेत. त्याद्वारे गुप्तपणे फोटो घेणे, आवाज रेकॉर्ड करणे आणि विविध प्रकारचा डेटा गोळा करणे शक्य असल्याचा दावा करण्यात येतो. त्याच्या सूक्ष्म आकारामुळे तो सहज लक्षात येत नाही, ही त्याची प्रमुख वैशिष्ट्ये मानली जातात.
विशेष म्हणजे हा ड्रोन रडारवरही सहज ओळखता येत नाही, असा दावा तज्ज्ञांकडून केला जात आहे. त्यामुळे तो खिडक्या किंवा छोट्या फटींमधूनही प्रवेश करून संवेदनशील ठिकाणांवर देखरेख ठेवू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
मात्र तज्ज्ञांच्या मते या तंत्रज्ञानात काही मर्यादाही आहेत. कमी वजनामुळे त्याची बॅटरी क्षमता मर्यादित असून उड्डाणाचा कालावधी कमी राहतो. तसेच वाऱ्याच्या तीव्र झोतामुळे त्याच्या दिशेत बदल होण्याची किंवा नियंत्रण सुटण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
दरम्यान, या ड्रोनची माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. नागरिकांमध्ये प्रायव्हसी आणि सुरक्षा याबाबत चिंता व्यक्त केली जात असून भविष्यात अशा तंत्रज्ञानामुळे कोणतीही जागा पूर्णतः सुरक्षित राहणार नाही, अशी भीतीही व्यक्त होत आहे.
