घोडसगाव जि.प.शाळेत प्रवेशासाठी पालकांच्या रांगा

0
17

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी

एप्रिल महिना म्हटला की, गावोगावी अनेक शाळांचे प्रवेशासाठी मोठमोठे बॅनर, फ्लेक्स, जाहिराती पहायला मिळतात. परंतु जि.प.मराठी प्राथमिक शाळा घोडसगाव पुनर्वसन ही शाळा त्याला अपवाद ठरली. ना जाहिरात, ना मोठे मोठे बॅनर, ना फ्लेक्स फक्त आणि फक्त शिक्षकांची कामावरील निष्ठा आणि ग्रामस्थ आणि पालकांना जि.प.शाळेचे पालटलेले महत्त्व त्यामुळे पालकांनी प्रवेशासाठी रांग लावून इयत्ता पहिलीत तब्बल एकाच दिवशी २० प्रवेश (ॲडमिशन) पूर्ण केले.

इयत्ता पहिलीत दाखल पात्र बालकांची शाळा पूर्वतयारी अभियानांतर्गत शाळेतील ‘पहिले पाऊल’ मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्यात सकाळपासूनच इयत्ता पहिलीची दाखल पात्र बालके व त्यांचे पालक सहभागी झाले होते. एक एक करत पालकांची प्रवेशासाठी लांबच लांब रांग तयार झाली. मेळाव्यात नाव नोंदणी, शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक व भावनिक विकास, भाषा विकास, गणन पूर्व तयारी व पालकांना मार्गदर्शन असे सात स्टॉल लावण्यात आले होते. प्रत्येक स्टॉल्सवर बालकांच्या कृतींच्या नोंदी विकास पत्रावर घेण्यात आल्या. एकाच दिवशी तब्बल २० मुलांचे इयत्ता पहिलीत प्रवेश निश्‍चित करण्यात आले. शेवटी पालकांसोबत मुलांचे सेल्फी काढून ‘माझा प्रवेश निश्‍चित’ असा बिल्ला लावून व गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करुन खाऊचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष वैशाली खोदले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी मदन मोरे, केंद्रप्रमुख विजय दुट्टे, शा.व्य. समितीचे अध्यक्ष नीलकंठ भगत, सदस्य रवींद्र पाटील, मुख्याध्यापक अनिल पवार, शिक्षक भिका जावरे, सोमनाथ गोंडगिरे, गोपाल दुतोंडे, स्वाती भंगाळे, अंगणवाडी सेविका यांच्यासह पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

शाळेचे रूप पलटले

जि.प.शाळा घोडसगाव येथील सर्व शिक्षक उपक्रमशील, मेहनती आहेत. त्यांच्यामुळे तसेच पालक आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच शाळेचे रूप पालटले आहे. शाळेला संपूर्ण जिल्ह्यात नावलौकिक मिळाला आहे, असे गौरवोद्गार गटशिक्षणाधिकारी मदन मोरे यांनी काढले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here