साईमत, चोपडा : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जनजागृती होण्याच्या उद्देशाने चोपडा तहसील कार्यालयाच्यावतीने मॅरेथॉन स्पर्धा आणि सायकल रॅलीचे आयोजन केले होते. सुरुवातीला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी हिरवा झेंडा दाखवत स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी विद्यार्थी, युवक मतदार, सायकल स्वार, क्रीडाशिक्षक तसेच कर्मचारी उपस्थित होते. स्पर्धेचा मार्ग नवीन प्रशासकीय इमारत परिसरातून चिंच चौक, गुजराती गल्ली, गोल मंदिर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सिव्हिल हॉस्पिटल ते पुन्हा नवीन प्रशासकीय इमारतीपर्यंत असा होता.
जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः सायकल चालवत गावातील मतदारांना मतदान करण्यासाठी प्रेरित केले. यावेळी त्यांच्यासोबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात, निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे, नायब तहसीलदार आर. आर. महाजन, स्वीप विभागाचे नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी अविनाश पाटील, स्वीपचे सहायक अधिकारी युवराज पाटील, सर्व क्षेत्रीय अधिकारी, नोडल अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, पोलीस निरिक्षक मधुकर साळवे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल पाटील आणि सर्व विभागांचे नोडल अधिकारी तथा कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षीसांचे वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन संजय बारी यांनी केले.
मॅरेथॉन स्पर्धेतील निकालात पुरुष गटात प्रथम विशाल संतोष पारधी, द्वितीय विकास गोविंदा भोई, तृतीय शिवानंद रमेश बारेला तर महिला गटात प्रथम पल्लवी चंदुलाल कोळी, द्वितीय प्रणाली गणेश पाटील, तृतीय दामिनी धनराज देवराज यांचा समावेश आहे.