साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
शाळेतील मुलांमध्ये वृक्षारोपण व पर्यावरणाबद्दल आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने जलमित्र परिवार चाळीसगावतर्फे २०२० पासून शालेय विद्यार्थ्यांसाठी हरित चाळीसगाव चषक स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. वृक्षसंवर्धनासाठी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा छान प्रतिसाद मिळत आहे. मुलांना शाळेत असतानाच स्थानिक झाडांची माहिती व्हावी, झाडांचे फायदे समजावेत, यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. स्पर्धकांच्या झाडाची सर्वांगीण वाढ विचारात घेऊन त्यांना बक्षीस दिले जाते. गेल्यावर्षी विद्यार्थ्यांनी जगविलेल्या झाडांची वाढलेली संख्या बघता झाडांचे संवर्धन करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे. तसेच स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच लावलेली झाडे जगविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या शाळांचाही विशेष सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
जलमित्र परिवाराचे सदस्य जलमित्र प्रा. आर. एम. पाटील यांच्यातर्फे कै.डॉ. ज्ञानेश चवात, अमरावती यांच्या स्मरणार्थ, जलमित्र हेमंत मालपुरे यांच्यातर्फे कै.सौ. रत्नाबाई जगन्नाथ मालपुरे, वाघळी यांच्या स्मरणार्थ जलमित्र चंद्रशेखर सिसोदे यांच्यातर्फे कै. उदयसिंग मोहनसिंग शिसोदे, कुंझर यांच्या स्मरणार्थ जलमित्र श्रीमती सविता राजपूत यांच्यातर्फे कै. सत्यवान दगडू जाधव, चाळीसगाव यांच्या स्मरणार्थ, जलमित्र सुचित्रा पाटील यांच्यातर्फे लोकनायक स्व. तात्यासाहेब महेंद्रसिंग राजपूत, चाळीसगाव यांच्या स्मरणार्थ, जलमित्र संजय गोविंद भालेराव यांच्यातर्फे कै. दादासाहेब गोविंदराव मोहनराव भालेराव, चाळीसगाव यांच्या स्मरणार्थ, जलमित्र प्रमोद दायमा यांच्यातर्फे कै. सत्यनारायण गोवर्धन दायमा, चाळीसगाव यांच्या स्मरणार्थ जलमित्र कुणाल रुईकर यांच्यातर्फे कै. राजेंद्र सोमनाथआप्पा रुईकर (बापु रुईकर), चाळीसगाव यांच्या स्मरणार्थ स्मृतीचिन्हाचे वाटप करण्यात आले.
यशस्वीतेसाठी वरखेडे येथील अण्णासाहेब उदेसिंग पवार सर्वोदय आश्रमशाळेतील सर्व शिक्षक, चिंचगव्हाण येथील माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षक, जलमित्र अमोल गायकवाड, मुजाहिद शेख, कळमडू येथील भूजल अभियानाचे गुणवंत सोनवणे, जिल्हा परिषद कन्या शाळेतील सर्व शिक्षक, माजी मुख्याध्यापिका पुष्पा बागुल तसेच वाघळी येथील यशवंत पब्लिक स्कुलचे संचालक परमानंद सूर्यवंशी यांचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या परीक्षक पदाची जबाबदारी पर्यावरणप्रेमी कृषी सहाय्यक तुफान खोत, शालिग्राम निकम यांनी पार पाडली.
तालुक्यातील सध्याची उन्हाची तीव्रता बघता येत्या पावसाळ्यात अधिकाधिक शाळांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना हरित चाळीसगाव चषक स्पर्धेत सहभाग घ्यायला लावून पर्यावरण संवर्धनासाठी खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन जलमित्र परिवार चाळीसगावतर्फे करण्यात येत आहे. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी जलमित्र शशांक अहिरे (९४२०३८२६१०) यांच्याशी संपर्क साधावा.