५० ते ६० कुटुंबांचा संपर्क तुटला; तातडीने रस्ता खुला न केल्यास आंदोलनाचा इशारा
साईमत -पाचोरा- प्रतिनिधी |
पाचोरा शहरालगतच्या पुनगाव शिवारातील राधाकृष्ण कॉलनीमार्गे कंदीलनगर परिसरात जाणारा महत्त्वाचा पर्यायी रस्ता भर पावसाळ्यात अचानक बंद करण्यात आल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला. या निर्णयाच्या विरोधात परिसरातील संतप्त रहिवाशांनी घटनास्थळीच ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कोणतीही पूर्वसूचना वा पर्यायी व्यवस्था न करता रस्ता बंद केल्याने परिसरातील सुमारे ५० ते ६० कुटुंबांचा दैनंदिन संपर्क तुटला आहे.
रस्ता बंद झाल्याने शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदारांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यातच पावसामुळे इतर पर्यायी मार्ग चिखलमय व धोकादायक बनल्याने अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने कोणतीही पूर्वकल्पना न देता हा रस्ता बंद केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
नागरिकांनी बंद केलेला रस्ता तातडीने पूर्ववत खुला करून त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने तातडीने तोडगा न काढल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल आणि उद्भवणाऱ्या परिस्थितीला प्रशासनच जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला.
प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
पावसाळ्यासारख्या संवेदनशील काळात नागरिकांची गैरसोय लक्षात न घेता रस्ता बंद केल्याने नगरपरिषद व संबंधित प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान, घटनेनंतरही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस भूमिका न घेण्यात आल्याने नागरिकांमधील असंतोष वाढला आहे.
