तांबापुरा भागातील २३ वर्षीय संशयिताला अटक; कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी
साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
शहर परिसरात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी एमआयडीसी पोलिसांनी विशेष मोहीम राबवत एका सराईत चोरट्याला जेरबंद केले आहे. त्याच्या ताब्यातून चोरीला गेलेल्या दोन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून, या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीचे गुन्हे वाढल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार विशेष तपास पथक तैनात करण्यात आले होते. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने तांबापुरा (मेहरूण) भागातील रहिवासी साहिल उर्फ मोहम्मद तडवी (वय २३) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
संशयिताकडून सुमारे ३० हजार रुपये किमतीची एक ‘हिरो एचएफ डिलक्स’ आणि १५ हजार रुपये किमतीची दुसरी ‘हिरो एचएफ डिलक्स’ अशा एकूण ४५ हजार रुपये मूल्याच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे शहर परिसरातील इतर दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
