साईमत -फैजपूर- प्रतिनिधी |
शहरातील मधुकर सहकारी साखर कारखाना परिसरातील पोस्ट कार्यालयात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत रोकडसह विविध साहित्य लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोस्टमास्तर फत्तू रमजान तडवी (वय ५७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २८ जुलै रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे कार्यालय बंद करण्यात आले होते. त्यानंतर २९ जुलै रोजी सकाळी कार्यालय उघडले असता दरवाज्याचे कोंडे तुटलेले दिसले. चोरट्यांनी आत प्रवेश करून २३ हजार ४५५ रुपयांची रोकड, ईएमओ मशीन, विविध रबर स्टॅम्प, पोस्टल स्टेशनरी, रेव्हेन्यू स्टॅम्प, कोरे पासबुक, एटीएम कार्ड आणि कोरे धनादेश असा एकूण २६ हजार १७१ रुपयांचा मुद्देमाल लांबवला.
घटनेची माहिती मिळताच फैजपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमान्वये अज्ञात आरोपींविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे पोस्ट कार्यालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
