तुटलेल्या सर्व्हिस वायरचा फटका तरुणाचा जागीच मृत्यू
साईमत /पाचोरा/ प्रतिनिधी :
शहरातील एका दुर्दैवी दुर्घटनेत २३ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याने पाचोरा शहरावर शोककळा पसरली आहे. घरालगत असलेल्या वीजवाहिनीच्या संपर्कात आल्याने हा अपघात घडल्याचे समोर आले असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
माजी नगरसेवक दत्तात्रय जडे यांचे पुत्र लोकेश दत्तात्रय जडे (वय २३) हे भडगाव येथे हॉटेल व्यवसाय करत होते. आपल्या कष्टाळू स्वभावामुळे त्यांनी अल्पावधीतच व्यवसायात चांगली प्रगती केली होती. मंगळवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे घराच्या बाहेरील लोखंडी जिन्यावरून वरच्या मजल्यावर जात असताना अचानक त्यांचा विजेच्या तारेशी संपर्क आला.
प्राथमिक माहितीनुसार, घराजवळून गेलेली वीज वितरण कंपनीची सर्व्हिस वायर काही दिवसांपासून खराब अवस्थेत होती. जिन्यावरून जात असताना लोकेश यांच्या शरीराला त्या तारेचा स्पर्श होताच त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. धक्क्याच्या तीव्रतेमुळे त्यांचा तोल जाऊन ते जिन्यावरून खाली पडले. आवाज ऐकून घरातील सदस्य आणि शेजारी तातडीने घटनास्थळी धावले.
कुटुंबीयांनी त्यांना त्वरित पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली.
तरुण वयातच लोकेश यांचे निधन झाल्याने जडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबाचा आधार असलेला मुलगा अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाची वार्ता पसरताच पाचोरा शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले.
दरम्यान, या दुर्घटनेनंतर शहरातील वीजवाहिन्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नागरिकांनी धोकादायक अवस्थेतील वीजतारा आणि उपकरणांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी संबंधित यंत्रणांनी अधिक दक्षता घेण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
