दुष्काळाच्या छायेत शेतकरी कोलमडला, अडावद येथे टोकाचे पाऊल कुटुंबावर दुःखाचा डोंगर
साईमत/अडावद (ता. चोपडा)/ प्रतिनिधी :
यंदाच्या खरीप हंगामातील अनिश्चित पावसामुळे आणि वाढत्या आर्थिक ताणतणावामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा गंभीर संकट ओढवल्याचे हृदयद्रावक चित्र अडावद येथे समोर आले आहे. वरचा माळी वाडा परिसरातील अल्पभूधारक शेतकरी गोविंदा चैत्राम गंभीर (वय ६५) यांनी आर्थिक विवंचना आणि मानसिक तणावातून टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
गोविंदा गंभीर हे पाच एकर कोरडवाहू शेतीवर आपला उदरनिर्वाह करत होते. मागील वर्षी मका पिकातून अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने त्यांच्यावर आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहिला होता. त्या तोट्याची भरपाई यावर्षीच्या हंगामातून होईल, या आशेने त्यांनी कर्ज काढून शेतीची तयारी केली होती. मात्र पावसाने दिलेली दडी आणि हवामानातील अनिश्चिततेमुळे त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले.
हंगाम हातातून जाण्याची भीती, घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची तसेच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता या सर्व बाबींमुळे ते मागील काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
१४ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. गंभीर यांनी राहत्या घराच्या छतावरून उडी घेत आपले जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
घटनेनंतर त्यांचा मृतदेह चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला. १५ जून रोजी सकाळी शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुपारी अडावद येथे नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेने कुटुंब पूर्णपणे कोलमडून गेले असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेने पुन्हा एकदा दुष्काळ, अनिश्चित पाऊस आणि आर्थिक अडचणी यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर निर्माण होणारे संकट अधोरेखित झाले आहे. शेतकरी कुटुंबांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याची भावना स्थानिक नागरिकांतून व्यक्त होत आहे.
