चोपडा नाका चौकात रेती डंपरची भीषण धडक; मुलगी थोडक्यात बचावली, नागरिकांचा संताप उसळला
साईमत/अमळनेर / प्रतिनिधी
अमळनेर शहरातील चोपडा नाका चौकात आज दुपारी घडलेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली. ओव्हरलोड रेती वाहून नेणाऱ्या भरधाव डंपरने रस्ता ओलांडणाऱ्या हर्षदा नावाच्या मुलीला जोरदार धडक दिली. या अपघातात ती डंपरच्या पुढील चाकाजवळ अडकली, मात्र प्रसंगावधान आणि नागरिकांच्या तत्काळ मदतीमुळे तिचा जीव वाचला.
मिळालेल्या माहितीनुसार, हर्षदा ही आपल्या वडिलांना डबा देण्यासाठी जात असताना चोपडा नाका चौकात ही दुर्घटना घडली. अचानक आलेल्या रेती डंपरने तिला धडक दिल्याने काही क्षणातच परिसरात गोंधळ निर्माण झाला. स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन धाडसाने बचावकार्य सुरू करत तिला चाकाखालून बाहेर काढले.
अपघातात हर्षदाच्या डोक्याला मुका मार लागला असून तिला तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.
अपघातग्रस्त डंपरचा क्रमांक MH18 B2 800 असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी ओव्हरलोड रेती वाहतुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, घटनास्थळापासून पोलीस चौकी जवळ असूनही सुरुवातीला पोलीस घटनास्थळी पोहोचले नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
चोपडा नाका चौकात जड वाहनांची वाढती वर्दळ, ओव्हरलोड रेती वाहतूक आणि वाहतूक नियंत्रणातील त्रुटी यामुळे अपघातांचा धोका वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या भागात तातडीने कठोर वाहतूक नियंत्रण उपाययोजना कराव्यात, तसेच रेती वाहतुकीवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
